पावसामुळे भाजीपाल्याच्या भावात होतेय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:16 AM2021-07-26T04:16:03+5:302021-07-26T04:16:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या चांगला पाऊस होत असल्याने सर्वांना दिलासा मिळत आहे, मात्र या पावसाचा भाजीपाल्याच्या आवकवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सध्या चांगला पाऊस होत असल्याने सर्वांना दिलासा मिळत आहे, मात्र या पावसाचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होऊन त्यांचे भाव वाढत आहेत. दुसरीकडे घसरण झालेल्या खाद्यतेलाच्या भावात पुन्हा वाढ झाली असून डाळींचेही भाव काहीसे वधारले आहेत.
पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली होती. मात्र या काळात पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक चांगली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून पाऊस होत असल्याने त्याचा भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होऊन भाव पुन्हा वाढत आहे. दुसरीकडे खाद्यतेलाच्या भावात काहीशी वाढ झाली आहे. मध्यंतरी १४० रुपयांवर आलेले सोयाबीन तेल पुन्हा १४५ रुपये, शेंगदाणा तेल १५० रुपयांवरून १६० रुपये, सूर्यफूल तेल १४० वरून १४७, तर पाम तेल १२० वरून १२६ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.
डाळीतही वाढ
मध्यंतरी घसरण झालेल्या डाळींच्या भावात थोडी वाढ झाली आहे. यात तूरडाळ ९० ते ९४ रुपये, मूगडाळ ८५ ते ९० रुपये, उडीदडाळ ८५ ते ९० रुपये, हरभरा डाळ ६२ ते ६६ रुपये, मसूर डाळ ६० ते ६५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. यामध्ये बेसनपीठ ८० ते ९० रुपये प्रति किलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रति किलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये, तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रति किलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहेत.
कोथिंबीर ८० रुपयांवर
पावसाचा हिरव्या पालेभाज्यांवर परिणाम झाल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांचे भाव वाढले आहेत. यामध्ये कोथिंबीरचे भाव ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तसेच मेथीदेखील ८० रुपये प्रति किलोवर तर पालक ७० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
हिरवी मिरची ६० रुपयांवर
हिरव्या मिरचीचेदेखील भाव वधारले असून ती ४० रुपयांवरून ६० रुपयांवर पोहोचली आहे. टमाटेदेखील ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. लिंबू ४० रुपये, बटाटे २० रुपये प्रति किलो तर कांद्याचे भाव अजूनही ३० रुपये प्रति किलोवर आहेत. लसूण १५० ते २०० रुपयांवर आहे.
भाजीपाल्याचे भाव वाढतच आहे. यात खाद्यतेलाचे भाव कमी झाले होते, मात्र आता ते पुन्हा वाढल्याने महागाईच्या झळाही वाढत आहेत.
- युवराज जाधव, ग्राहक
खाद्यतेलाचे भाव मध्यंतरी कमी होते, मात्र आता ते काहीसे वाढले असून डाळींच्याही भावात काहीशी वाढ झाली आहे. तशी ग्राहकही अजून कमीच आहेत.
- राजेश वाणी, व्यापारी
पाऊस होत असल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढत आहे. कांदे, बटाटे मात्र स्थिर आहेत.
- अरुण गायकवाड, भाजीपाला विक्रेते