जळगावात दमदारसह रिमझिम पाऊस : आषाढाताच श्रावणाची अनुभुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 01:05 AM2019-07-07T01:05:17+5:302019-07-07T01:05:45+5:30
शहरातील रस्त्यांची मात्र लागली वाट
जळगाव : मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसाने सध्या चांगलीच कृपा केली असून दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. रिमझिम पावसाच्या सरींमध्ये मध्येच दमदार पावसाची हजेरी यामुळे आषाढ मासातच श्रावणाची अनुभुती सध्या येत आहे. दरम्यान, शहरात अमृत योजनेसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवर पावसामुळे सर्वत्र चिखल होऊन वाहने घसरुन वाहधारक जखमी होत असल्याच्या घटना वाढत आहेत.
यंदा जून महिना संपत आला तरी पावसाने दडी मारल्याने सर्वच चिंतातूर झाले होते. २६ जून रोजी दमदार पाऊस झाला व सर्वांना दिलासा मिळाला. त्यानंतर दररोज अधून-मधून पाऊस सुरूच आहे.
शनिवारी सूर्यदर्शन नाही
दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. शुक्रवारी सकाळपासून रात्रीपर्यंत अशाच प्रकारे रिपरिप सुरू होती. त्यानंतर शनिवारी तर सूर्यदर्शनही झाले नाही. सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. दुपारी १२ वाजेपर्यंत चांगला पाऊस झाला. त्यानंतर थोडावेळ उघडीप मिळाली व दीड वाजेपासून पुन्हा एक तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर थोडा वेळ उघडीत मिळाली की पुन्हा पावसाच्या अधूनमधून सरी कोसळतच राहिल्या. यामुळे आषाढ महिन्यातच श्रावणातील पावसाचा अनुभव शहरवासीयांनी घेतला.
रस्ते चिखलमय
पावसामुळे सर्वांना दिलासा असला तरी शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांमधील रस्ते चिखलमय झाले आहेत. यामुळे नागरिकांना पायी चालतानाही मोठी कसरत करावी लागत आहे. अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे रस्त्यांचे खोदकाम झाले व त्यानंतर हे रस्ते व्यवस्थित दुरुस्त न केल्यामुळे ही स्थिती ओढावली असून शहरातील प्रत्येक भागात सारखीच परिस्थिती निर्माण झाल्याने शहरवासीय हैराण झाले आहेत.
शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांचेही खोदकाम झाले आहे. खोदण्यात आलेल्या भागाची दुरुस्ती करून हे रस्ते पूर्ववत करण्याची गरज होती, मात्र संबधित मक्तेदाराकडून हे काम झाले नाही. त्यामुळे मातीमुळे सगळीकडे चिखल झाला आहे.खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती व्यवस्थित न झाल्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे.
वाहनधारकांची कसरत
चिखलामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. चिखलामुळे वाहने घसरत असून वाहनाचा ब्रेक लावणेही जिकरीचे ठरत आहे. जिल्हाधिकारी निवासस्थान ते गिरणा टाकीदरम्यानचा रस्ता असो की ख्वाजामिया चौक, रिंग रोड, पिंप्राळा रोड, वाघ नगर परिसर, महाबळ परिसरातील अनेक कॉलनी भाग येथेमोठेहालहोतआहेत.