कोरोनाला हरविण्यासाठी ‘आरोग्याची गुढी उभारा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:49+5:302021-04-13T04:14:49+5:30
खरेदी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, नागरिकांनी शासन ...
खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, नागरिकांनी शासन व प्रशासनाने आखून दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. परिस्थिती गंभीर असली तरी या परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबून व नियमांचे पालन करून आरोग्याची गुढी उभारावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. तसेच परिस्थितीवर मात करण्यासाठी लवकरच आरोग्य विभागात विविध पदांची भरती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकमत जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व लोकमत उपमहाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी त्यांचे स्वागत केले. कोरोनामुळे परिस्थिती गंभीर होत असली तरी जिल्ह्यातील प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा ती आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
शासकीय दवाखान्यात रेमडेसिविरचा मुबलक पुरवठा
राज्यासह जिल्ह्यातदेखील रेमडेसिविरचा तुटवडा कायम आहे. यासाठी गौण खनिजमधील १ कोटी रुपयांच्या निधीतून १० हजार रेमडेसिविरच्या खरेदीचा प्रस्ताव देण्यात आला असून, लवकरच जिल्ह्यात १० हजार रेमडेसिविर प्राप्त होतील. सद्य:स्थितीत शासकीय दवाखान्यात रेमडेसिविरची मुबलकता असून, खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. ज्या रुग्णांना खरेच गरज आहे त्या रुग्णांनाच रेमडेसिविर देण्यात यावी, मात्र ज्या रुग्णांना गरज नाही अशा रुग्णांना त्या देण्यात येऊ नये, अशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
हॉटस्पॉट तालुक्यांमधील प्राथमिक आरोग्य यंत्रणा बळकट करणार
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ ठरावीक तालुक्यांमध्येच मोठ्या प्रमाणात होत आहे. जळगाव शहरासह चोपडा, भुसावळ, अमळनेर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संख्या वाढत आहे. यामुळे या तालुक्यांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिक बळकट करून, त्या तालुक्यांतील रुग्णांना तालुक्यांमध्येच उपचार मिळावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जेणेकरून जळगाव शहरातील आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकेल.
अंगावर काढल्याने ऑक्सिजनच्या रुग्णसंख्येत वाढ
अनेक नागरिकांना कोरोनाची लक्षणे जाणविल्यानंतरदेखील अनेक दिवस हे रुग्ण घरीच प्राथमिक उपचार घेत आहेत. काही दिवसांनंतर तब्येत बिघडल्यानंतर हे रुग्ण थेट रुग्णालयात दाखल होतात. त्यावेळेस त्यांची तब्येत अधिक खराब झाल्याने थेट ऑक्सिजन लावण्यात येतो. यामुळे ऑक्सिजनचे बेड मिळणे कठीण होत जाते. जर या रुग्णांनी वेळीच योग्य उपचार घेतले तर ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती. दरम्यान, मोहाडी येथील रुग्णालयात अजून २०० बेड्सची व्यवस्था करण्याबाबत सूचना दिल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
दोन दिवसांत आरोग्य विभागात कंत्राटी नोकरभरती
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. यामुळे ही यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कंत्राटी भरती काढून काही जागा भरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊन रुग्णांना चांगले उपचार मिळू शकतात. तसेच जिल्ह्यात लसीकरण वाढविण्यासाठीही राज्य शासनाच्या यंत्रणेशी सातत्याने संपर्कात असून, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यासह रुग्णांच शोध घेऊन वेळीच या संसर्गाला आळा घालण्याबाबतदेखील प्रशासनाला सूचना दिल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.