विद्यापीठात मुख्य पदांवर प्रभारी राज, मग पदभरती का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:12 AM2021-06-29T04:12:14+5:302021-06-29T04:12:14+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्वच मुख्यपदांवर प्रभारी राज सुरू असताना संविधानिक पदे व विद्यापीठ फंडातून ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्वच मुख्यपदांवर प्रभारी राज सुरू असताना संविधानिक पदे व विद्यापीठ फंडातून इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ही भरती प्रक्रिया संशयास्पद असून ती थांबविण्यात यावी व नियमित कुलगुरूंच्या नियुक्तीनंतरच विद्यापीठात पदभरती व्हावी, अशी मागणी विद्यापीठाच्या ११ अधिसभा सदस्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठातील संविधानिक पदे भरण्यासाठी नुकतीच शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संविधानिक पदांसोबत, विद्यापीठ फंडातून करारांवर तात्पुरत्या स्वरूपातील पदांसाठीसुद्धा पदभरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही भरती संशयास्पद असल्याचा आरोप अधिसभा सदस्यांनी केला आहे. तसेच तत्कालीन कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर विद्यापीठातील कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाता ही पदे रिक्त झालेली आहेत. प्रभारी कुलगुरू म्हणून कुलपती यांनी नाशिक येथील यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. वायुनंदन यांची तर प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून प्रा. बी. व्ही. पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे बी. व्ही. पवार यांची प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याने प्रभारी कुलसचिवपदी प्रा. ए. बी. चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, चौधरी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते वैद्यकीय रजेवर गेले असता डॉ. शामकांत भादलीकर यांची प्रभारी कुलसचिव पदी नेमणूक करण्यात आली. वैदयकीय रजेनंतर प्रा. चौधरी हे कामावर रुजू होऊनसुद्धा डॉ. भादलीकर हेच प्रभारी कुलसचिव म्हणून आजही काम बघत आहेत. त्यांच्याच मार्फत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. तसेच त्यांच्यावरील गैरकारभाराची चौकशी सुरू आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीकडे हे पद देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मग ही भरती प्रक्रिया का?
विविध पदांसाठी विद्यापीठाने जाहिरात प्रक्रिया राबविली आहे. जाहिरातीतील काही संविधानिक पदांचा पदावधी हा प्रभारी कुलगुरुंच्या पदावधी इतकाच असल्याने अशी पदे केवळ ३ ते ४ महिन्यांसाठी भरून विद्यापीठाला काय साध्य करावयाचे आहे, असा सवाल अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला आहे. शेवटी अशा पदांसाठी पुन्हा ३ ते ४ महिन्यानंतर नवीन भरती प्रक्रिया राबवावीच लागणार आहे. त्यामुळे नियमित कुलगुरूंच्या नियुक्तीनंतर विद्यापीठातील पदभरती करावी व तशा सूचना जारी कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी माजी पालकमंत्री तथा अधिसभा सदस्य डॉ. सतीश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. अनिल पाटील, प्रा. एकनाथ नेहते, प्राचार्या. डॉ. संध्या सोनवणे, प्रा. डॉ. किशोर कोल्हे, प्रा. डॉ. प्रकाश अहिरराव, प्रा. डॉ. मोहन पावरा, प्रा .डॉ. सुनील गोसावी, प्रा. डॉ. अजय सुरवाडे आदींनी केली आहे.