११४ विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:12 AM2021-07-18T04:12:26+5:302021-07-18T04:12:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय ...

Rajarshi Shahu Maharaj Merit Award to 114 students | ११४ विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

११४ विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुला-मुलींना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. नुकतेच शाळा व कनिष्‍ठ महाविद्यालयात प्रथम येणाऱ्या अनुसूचित जातीतील ११४ विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्‍यात आले आहे.

अनुसूचित जाती, विजाभज आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाने २००३ मध्ये गुणवत्ता पुरस्कार सुरू केले आहेत. यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार दिले जातात. सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून अनुसूचित जाती, विजाभज आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावीत राज्यात प्रथम आल्यास अडीच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र राज्य शासनाकडून देण्‍यात येते. प्रत्येक बोर्डातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला एक लाख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्‍ये आलेल्या अनुसूचित जाती, विजाभज आणि विशेष मागास प्रवर्गाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ५० हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, त्याचबरोबर जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व तालुक्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला दहा हजार रुपये स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्‍यात येते. तसेच शाळेत व कनिष्‍ठ महाविद्यालयात प्रथम येणाऱ्यांना पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र दिले जाते.

बोर्डाकडून यादी प्राप्त

काही दिवसांपूर्वी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाला जळगाव जिल्ह्यातील दहावी व बारावीत शाळा व महाविद्यालयात प्रथम येणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची यादी बोर्डाकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार ११४ प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयातर्फे राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्‍यात आला आहे.

अशी आहेत पुरस्कार प्राप्त विद्यार्थी

एकूण ११४ पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दहावीतील ८५ तर इयत्ता बारावीतील २९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नुकतीच पुरस्काराची रक्कम शाळा, महाविद्यालयांना पाठविण्यात आली आहे. शाळांकडून धनादेशाच्या स्वरूपात ही रक्कम विद्यार्थ्यांना प्रदान करण्‍यात येत आहे.

०००००००००००००

पुरस्काराची रक्कम

राज्यातून प्रथम : २,५००००

बोर्डातून प्रथम : १,०००००

विभागीय बोर्डातून प्रथम : ५०,०००

जिल्ह्यातून प्रथम : २५,०००

तालुक्यातून प्रथम : १०,०००

शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम : ५,०००

०००००००००००००००

पुरस्कार प्राप्त विद्यार्थी संख्या

एकूण : ११४

इयत्ता १० वी : ८५

इयत्ता १२ वी : २९

Web Title: Rajarshi Shahu Maharaj Merit Award to 114 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.