राजस्थान, मध्यप्रदेश सरकारने खरेदी वाढविल्याने गव्हाची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:15 AM2021-04-19T04:15:07+5:302021-04-19T04:15:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गव्हाची मुख्य आवक असलेल्या मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये तेथील राज्य सरकारने खरेदी वाढविल्याने महाराष्ट्रात गव्हाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गव्हाची मुख्य आवक असलेल्या मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये तेथील राज्य सरकारने खरेदी वाढविल्याने महाराष्ट्रात गव्हाची आवक कमी झाली आहे. त्यासोबतच इंधन दरवाढ व अवकाळी पावसाचा फटका यामुळे गव्हाचे भाव २०० रुपये प्रति क्विंटलने वधारले आहे.
मार्च-एप्रिल महिन्यापासून वर्षभराचे धान्य खरेदी करण्याकडे कल असतो. दरवर्षी या दिवसात राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत असते. यंदा देखील सुरुवातीच्या काळात ही आवक चांगली झाली. मात्र १ एप्रिलपासून राजस्थान व मध्य प्रदेश सरकारने गव्हाची खरेदी वाढविली आहे. विविध शासकीय योजना व कोरोनाच्या काळात जनतेला मदत म्हणून तेथे सरकारच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे या राज्यात खरेदी वाढल्याने महाराष्ट्रात येणाऱ्या गव्हाची आवक कमी झाली आहे. यात व्यापाऱ्यांना देखील त्यांच्या मागणीच्या तुलनेत गहू कमी मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. साधारण एक हजार टन असणारी आवक सध्या ७०० ते ७५० टनवर आली आहे.
व्यापाऱ्यांना देखील त्यांच्या मागणीच्या तुलनेत २५ ते ३० टक्क्यांनी कमी माल मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मागणी व पुरवठ्याच्या हिशोबानुसार गव्हाची भाव वाढ होत आहे.
आधारभूत किंमत वाढण्यासह इंधन दरवाढीचा भार
एक तर गव्हाची आवक कमी झालेली आहे, त्यात यावेळी सरकारने गव्हाच्या आधारभूत किमतीत वाढ करून दोन हजार रुपये प्रति क्विंटल भाव गव्हासाठी घोषित केला आहे. त्यामुळे देखील यंदा गव्हाचे भाव वाढले आहे. यासोबतच डिझेलचे दर वाढल्याने देखील अधिक भाडे मोजावे लागत असल्याने भाववाढीत भर पडत आहे. याशिवाय मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. याशिवाय राजस्थान, मध्यप्रदेश सरकारने खरेदी वाढविण्यासह विविध मल्टिनॅशनल कंपन्यांकडून देखील गव्हाची खरेदी केली जात आहे. या सर्वांचा परिणाम होऊन गव्हाचे भाव गेल्या महिन्याच्या तुलनेत सध्या २०० रुपये प्रति क्विंटलने वाढले आहे.
यामुळे १४७ गहू २३५० ते २४००, शरबती गहू २४५० ते २५००, लोकवन गहू २२५० ते २३००, चंदोसी गहू ४००० ते ४२०० रुपये प्रति क्विंटल वर पोहोचले आहे.
--------------
मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये गव्हाची खरेदी वाढल्याने गव्हाची आवक कमी झाली आहे. यासोबतच इंधन दरवाढीमुळे गव्हाचे भाव वाढले आहे.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.