प्राचीनतेची साक्ष देणारा राजदेहरे किल्ला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:19 AM2021-08-14T04:19:49+5:302021-08-14T04:19:49+5:30

लेखक - जिजाबराव वाघ, चाळीसगाव फोटो १) हिरव्या सौंदर्याने नटलेला किल्ले राजदेहरे. २) किल्ल्यावर असणारे साचपाण्याचे टाक. ...

Rajdehare fort bears witness to antiquity! | प्राचीनतेची साक्ष देणारा राजदेहरे किल्ला !

प्राचीनतेची साक्ष देणारा राजदेहरे किल्ला !

Next

लेखक - जिजाबराव वाघ, चाळीसगाव

फोटो १) हिरव्या सौंदर्याने नटलेला किल्ले राजदेहरे.

२) किल्ल्यावर असणारे साचपाण्याचे टाक.

'भारदस्त, स्थितप्रज्ञ, प्राचीनतेची साक्ष... अशा विविध कातळ आभूषणांनी ‘राजदेहरे’ किल्ल्याचे सौंदर्य अजून खुलून दिसते. पावसाळ्यात तर त्याचे हे नखशिखांत भिजसौंदर्य भटक्यांची पावलं आपल्याकडे खेचून घेते. चाळीसगावच्या दक्षिण टोकाला अवघ्या २७ किमी अंतरावर असणारे हे दुर्गवैभव आज मात्र संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. किल्ल्याच्या प्राचीनतेची साक्ष देणाऱ्या काही खुणा आणि अवशेष तेवढे येथे उरले आहेत.

चाळीसगावहून सायकलसफरीने ८ रोजी किल्ले राजदेहरे येथे गेलो.

सातमाळा डोंगररांगांमध्ये एखाद्या मुकुटमण्यासारखा राजदेहरे किल्ला लक्ष वेधून घेतो. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत दुचाकीने सहज जाता येते. चारचाकी गाडीची चाके जवळच असणाऱ्या गंगाश्रम स्थळी थांबवावी लागतात. येथून पुढे किल्ल्याची चढाई करावी लागते.

काहीसा दुर्लक्षित असणारा हा किल्ला पावसाळ्यात रानसौंदर्याने झळाळून निघतो. त्यामुळे कंबरेपर्यंतच्या गवतातूनच वाट शोधत पुढे निघावे लागते. उंच कडे, बुरुजावरून फेसाळत जमिनीकडे झेपावणाऱ्या पाऊसधारा असंख्य लहान-मोठ्या धबधब्यांच्या रूपाने कोसळतात. यंदा मात्र चाळीसगाव परिसरावर आभाळमाया रुसल्याने किल्ल्याच्या काळ्याशार अंगावरील धबधब्यांचे पांढरे गोंदण तेवढे नजरेस पडते. हिरवळीचा साज मोहून टाकतो.

किल्ले राजदेहरे दोन डोंगरांवर वसलेला असून त्यामध्ये असलेल्या घळीतून किल्ल्याचा प्रवेश ठेवून स्थापत्यकाराने किल्ल्यावर चालून येणारा शत्रू दोन्ही डोंगरांवरून होणाऱ्या माऱ्याच्या टप्प्यात राहील, अशी योजना केलेली आहे. या पुरातन किल्ल्यावर आजही पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. रक्षण व संवर्धन होत नसल्याने प्राचीन अवशेषांची झीज होत आहे.

राजदेहरे हा किल्ला गवळीकालीन किंवा यादव पूर्वकालीन असावा. इ.स. १००० ते १२१६ पर्यंत निकुंभ राजांची या भागावर सत्ता होती. पाटणे या राजधानीजवळच हा किल्ला असल्यामुळे लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाई. इ.स. १२१६-१७ च्या सुमारास यादवांनी हा किल्ला ताब्यात घेतला. यादवांनंतर अल्लाउद्दीन खिलजीकडे व त्यानंतर फारुकींकडे हा किल्ला होता. इ.स. १६०१ मध्ये खान्देश सुभा मुघलांकडे गेला. त्या वेळी भडगावच्या रामजीपंतांनी अशिरगडच्या वेढ्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना जहागिरी देण्यात आली. त्यात राजदेहरे किल्ल्याचा समावेश होता. किल्ल्यास ऐतिहासिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. गवळीकालीन असणाऱ्या राजदेहरे किल्ल्यावर यादव राजांचाही एकेकाळी ध्वज होता.

उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपला गडावर प्रवेश होतो. जवळच व्यालमुख असलेले दोन भग्न स्तंभ पडलेले दिसतात. प्रवेशद्वाराच्या थोड्या वरच्या अंगाला दगडात खोदलेले रिकामे लेणे आहे. त्याच्या बाजूस एक गुहा व पाण्याचे टाक आहे. या ठिकाणाहून संपूर्ण किल्ला दृष्टिक्षेपात येतो. तेथून खाली उतरून पुन्हा प्रवेशद्वारापाशी येऊन गडफेरी सुरू केल्यावर पाण्याचे दोन खांबी टाक लागतात. येथून पुढे गेल्यावर एक गुहा व चार खांबी टाक आहे. गडाच्या माचीवर साचपाण्याचा तलाव असून त्याच्या बाजूलाच नंदी व पिंड उघड्यावर पडलेले आहेत. तलावावरून पुढे गेल्यावर दगडात खोदलेल्या पादुका पाहायला मिळतात. तेथून माचीवर निमुळत्या टोकापर्यंत गेल्यावर आजूबाजूचा विस्तृत प्रदेश व राजधेरवाडी (राजदेहरे) गाव दिसते.

माचीच्या टोकावरून किल्ल्याकडे जाताना डाव्या हातास पाण्याचे एक टाक आहे. किल्ल्यावरून उतरून ही तटबंदी ओलांडून गडाला वळसा घालूनही उतरता येते. मनमाड-भुसावळ रेल्वेमार्गावर नांदगाव स्थानकावर उतरूनही राजदेहरे किल्ल्यावर जाणे सोयीचे आहे. हे अंतर ५० किमी असून जाण्यासाठी चारचाकी गाड्या मिळतात. चाळीसगाव - न्यायडोंगरी तसेच हिरापूरहून घोडेगाव मार्गाने राजदेहरे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. किल्ल्याच्या पायथ्याशी गंगाश्रम व श्रावणतळे ही दोन प्रसन्न धार्मिक स्थळे आहेत.

Web Title: Rajdehare fort bears witness to antiquity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.