राजीव कपूर यांचा शिवतीर्थ मैदानावर झाला होता भव्य सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:17 AM2021-02-10T04:17:06+5:302021-02-10T04:17:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे उपचारादरम्यान मंगळवारी मुंबई येथे निधन झाले. राजीव कपूर हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे उपचारादरम्यान मंगळवारी मुंबई येथे निधन झाले. राजीव कपूर हे १९८७ च्या सुमारास जळगावला आले आहे. त्यावेळी राज कपूर यांनी जळगाव शहरातील फुले मार्केटच्या दुसऱ्या मजल्याचे उद्घाटन केले. त्यावेळी राजीव कपूर हे त्यांच्यासोबत होते.
त्यावेळच्या आठवणी सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हाजी गफ्फार मलिक यांनी सांगितले की, ‘सुरेशदादा जैन यांचे वडील भिकमचंद जैन हे नगराध्यक्ष असताना त्यांनी फुले मार्केटच्या पहिल्या मजल्याची निर्मिती केली होती. त्यावेळी पृथ्वीराज कपूर यांना निमंत्रित केले होते. त्याचा फलक अजूनही आहे. त्यानंतर दुसरा मजला बांधला गेला. त्यावेळी राज कपूर हे आले होते. त्यावेळी राज कपूर यांच्यासोबत त्यांचा मुलगा म्हणजे राजीव कपूर आले होते. त्यासोबतच जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी देखील राजीव कपूर उपस्थित होते.’
त्यासोबतच शहरातील शिवाजी उद्यानाचे उद्घाटनदेखील पृथ्वीराज कपूर यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमालादेखील राज कपूर यांनी उपस्थिती दिली होती. त्यावेळी झालेल्या तीनही कार्यक्रमांना राज कपूर यांच्यासोबत अभिनेते राजीव कपूर उपस्थित असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, राजकपूर व राजीव कपूर १९८९ मध्ये जळगावला आले असता जैन इरिगेशनच्या एमआयएस प्रकल्पाला त्यांनी भेट दिली होती. यावेळी जैन उद्योग समूहाचे संस्थापक स्व. भवरलाल जैन यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले होते.