संत मुक्ताई संस्थानने पाठविली संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ व सोपानदेवांना राखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:14 AM2017-08-08T00:14:49+5:302017-08-08T00:16:05+5:30
यंदापासून उपक्रम : विश्व पट ब्रrादारा.. ताटी उघडा ज्ञानेश्वरा..
ऑनलाईन लोकमत / विनायक वाडेकर
मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 7 - : बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. या पवित्र धाग्याचे नाते जपत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांना रविवारी हातोहात राखी पाठविण्यात आली. आळंदी संस्थानकडूनही या प्रेमाच्या धाग्याचा स्वीकार करीत विश्व पट ब्रrादारा (धागा).. ताटी उघडा ज्ञानेश्वरा .. या ताटीच्या अभंगाची जणू आठवण करून दिली. याशिवाय त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज व सासवडला संत सोपानदेवांनाही शनिवारी टपालातून राखी पाठविण्यात आल्याची माहिती विश्वस्तांनी दिली.
मुक्ताई संस्थानकडून संत भावंडांना राखी पाठविण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. बहीण - भावाच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेल्या राखीच्या धाग्याने आज ही दोन संस्थाने जोडलीच, शिवाय प्रेमाचा ओलावाही निर्माण झाला. मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्या संकल्पनेनुसार रविवारी संस्थानचे पदाधिकारी आळंदीत पोहचले. तिथे संत मुक्ताईतर्फे संत ज्ञानेश्वर माऊलींना राखी पौणिमेनिमित्त राखी अर्पण करण्यात आली. आळंदीच्या संत ज्ञानेश्वर माऊली संस्थानच्या वतीने विश्वस्त अभय टिळक व पदाधिका:यांनी या राखीचा स्वीकार केला. संस्थानच्या वतीने संदीप रवींद्र पाटील, लहूदकर महाराज, सागर महाराज हे राखी घेऊन आळंदीला गेले होते.
आषाढी वारीच्या वेळी पंढरपूर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र येत असतात. त्या वेळी ज्ञानेश्वर महाराज पालखीकडून संत मुक्ताई पालखीला साडी-चोळी अर्पण केली जाते. गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. ती अजूनही सुरू आहे. आता मुक्ताईकडून ज्ञानोबारायांना राखी अर्पण करून हीच परंपरा पुढे नेली जात आहे.
संत मुक्ताईमुळेच निवृत्तीनाथ, ज्ञानोबा माऊली आणि सोपानदादा हे संतपदार्पयत पोहचले. मुक्ताईमुळेच ताटीचे अभंग बाहेर आले.. या राखीचा आम्ही आनंदात स्वीकार करतो.. हे प्रेम आजच नाही भविष्यातही कायम राहिल.
-अभय टिळक, विश्वस्त, आळंदी संस्थान.
यापुढे दरवर्षी मुक्ताई संस्थानकडून तीनही भावंडांना राखी पाठविली जाणार आहे. यावर्षी सुरुवात केली आहे. मुक्ताईनगरमधूनच या राख्या घेण्यात आल्या आहेत.
-संदीप पाटील, विश्वस्त, मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर.