चाळीसगाव येथील तरुणीवर जळगावात हॉटेल मालकाकडून बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:13 PM2018-05-13T12:13:57+5:302018-05-13T12:13:57+5:30
गुंगीचे औषध देऊन दुसऱ्यानेही केला अत्याचार
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १३ - नोकरीसाठी आलेल्या चाळीसगाव येथील २३ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी हॉटेल रिगल पॅलेसचे मालक संदीप चंद्रकांत अडवाणी याच्यावर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात संदीप याला मदत करणारे वडील चंद्रकांत अडवाणी, काका हरिश अडवाणी व चुलत भाऊ राहूल अडवाणी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आॅक्टोबर २०१४ मध्ये हॉटेल रिगल पॅलेसमध्ये परचेसिंगसाठी मुले, मुली पाहिजेत अशी जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द झाली होती. त्यानुसार पीडित तरुणी मुलाखतीसाठी आली होती. व्यवस्थापक नारायण जमनाणी यांनी नोकरी दिली.
या काळात मालक संदीप याच्याशी पीडित तरुणीचा संपर्क आला. बाहेर किराणा व इतर साहित्य घेण्यासाठी संदीप हा स्वत: आला. त्याच्या कारमध्ये घेऊन जात असताना संदीप याने अश्लिल वर्तन केले. त्यावेळी त्याला कडक शब्दात सुनावून पीडितेने काम सोडले होते व हा प्रकार घरी कुटुंबात सांगितला होता. दुसºया दिवशी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली असता तेथे व्यवस्थापक जमनाणी हे आले. तक्रार देऊ नये यासाठी विनंती करु लागले. त्यानंतर तक्रार मागे घेण्यात आली.
मी करोडपती
पीडित तरुणीने संदीप याच्या वडिलांकडे घटना कथन केली असता, त्यांनी पीडितेला खडेबोल सुनावले तसेच मी करोडपती आहे, माझे हात वरपर्यंत पोहचले आहे, तू येथून निघून जा, अशा शब्दात बोलून हाकलून लावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने पीडित तरुणीने शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
अश्लील फोटो काढले
हॉटेलच्या एका खोलीत संदीप याने ज्युसमध्ये गुंगीचे औषध दिले. त्यावेळी त्याने अश्लिल फोटो काढले. हे फोटो आजही त्याच्या मोबाईलमध्ये आहेत. त्याचवेळी एक अनोळखी व्यक्ती त्या खोलीत आली व त्यानेही बलात्कार केल्याचे पीडित तरुणीचे म्हणणे आहे. दरम्यान, शनिवारी पीडित तरुणीची वैद्यकिय तपासणी करण्यात आली.
संदीपच्या पित्याकडून अश्लील वर्तन
पीडित तरुणी पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर संदीप याने पत्नीला घटस्फोट देऊन पुन्हा लग्नाची मागणी केली. त्यानंतर त्याने सतत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध ठेवले. लग्नासाठी टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने संदीप याचे वडील चंद्रकांत यांना घटना कथन केली असता त्यांनी स्वत:साठी शारीरीक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.