जळगाव : सावरकर गौरव यात्रेच्या समारोपासाठी उद्या रॅली,अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 06:27 PM2023-04-04T18:27:05+5:302023-04-04T18:27:16+5:30
भाजप-शिवसेनेच्यावतीने ३० मार्चपासून सावरकर गौरव राज्यव्यापी यात्रा काढण्यात आली आहे.
कुंदन पाटील
जळगाव - भाजप-शिवसेनेच्यावतीने ३० मार्चपासून सावरकर गौरव राज्यव्यापी यात्रा काढण्यात आली आहे. दि.६ रोजी भाजपचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने शहरातून सावरकर गौरव रॅली काढून तिचा समारोप करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी दिली.
भाजपच्या ‘वसंत-स्मृती’ कार्यालयात त्यांनी ही माहिती पत्रकारांन दिली. या रॅलीचा भाजप कार्यालयापासून प्रारंभ होणार आहे. सुभाष चौक, चित्रा चौकमार्गे सावरकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीची सांगता होणार आहे. प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, सरचिटणीस संजय उपाध्याय, मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, उन्मेश पाटील, आमदार जयकुमार रावल, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, महामंत्री विजय चौधरी, दीपक सुर्यवंशी, पी.सी.पाटील, नंदू महाजन, प्रल्हाद पाटील, के.बी.पाटील, राकेश पाटील, सचीन पानपाटील, हर्षल पाटील आदी रॅलीच्या सांगतावेळी उपस्थित राहणार आहेत.
सोमवारी प्रदेशाध्यक्ष दौऱ्यावर
दरम्यान, दि.१० रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत मेळाव्यासह विविध शाखांचे उद्घाटन तसेच काहींचे पक्ष प्रवेश होणार आहे. या दौऱ्यात बावनकुळे काही जणांच्या भेटीही घेणार असल्याचे भोळे यांनी सांगितले.
तर ठेकेदारच जबाबदार
विकासासाठी निधी आणण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. त्यानुसार शहरातील रस्त्यांसह काही कामांसाठी निधी उपलब्ध केला आहे. मात्र या रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. दर्जा नसलेल्या कामांविषयी यापूर्वीच तक्रारी केल्या आहेत. तरीही दखल न घेणारे ठेकेदार सध्या क्षणिक सुखात आहेत. मात्र शासन आदेशानुसार रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराला आगामी पाच वर्ष रस्त्याची निगा राखावी लागणार आहे, हे त्यांनी विसरु नये. यासंदर्भात वेळोवेळी नक्कीच पाठपुरावा करु, असे भोळे यांनी सांगितले.
आयुक्तांनी दौरा करावा
शहरातील कुठला रस्ता खराब आहे, याची चाचपणी करण्यासाठी स्वत: मनपा आयुक्तांनी दौरा करावा, तपासणी करावी.सध्या मनपा कर्जमुक्त आहे. त्यामुळे रस्त्यांसह अन्य विकास कामांसाठी मनपा आयुक्तांनी स्वत:च पुढाकारा घ्यावा, असे आवाहन भोळे यांनी यावेळी केले.