राम मंदिर केवळ मंदिर नाही रामराज्याची पायाभरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:41 AM2021-01-13T04:41:11+5:302021-01-13T04:41:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राम मंदिर अर्थात राष्ट्र मंदिर हे केवळ मंदिर नसून हा एक आदर्श आहे. रामराज्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राम मंदिर अर्थात राष्ट्र मंदिर हे केवळ मंदिर नसून हा एक आदर्श आहे. रामराज्याची पायाभरणी आहे. ते सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे, स्त्री सुरक्षेचा आदर्श आहे, साधुसंतांच्या संघर्षाचे प्रतीक असल्याचा सूर राष्ट्र मंदिर उभारणी टॉक शोमध्ये उमटला. श्री रामजन्मभूमी निधी समर्पण अभियानांतर्गत या टॉक शोचे संभाजीराजे नाट्यगृहात मंगळवारी सायंकाळी सात वाजता आयोजन करण्यात आले होते.
महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी, अनघा कुलकर्णी आणि औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे प्रकल्प संचालक डॉ. प्रसन्न पाटील यांनी सहभाग नोंदविला. विविध मुद्द्यांवर त्यांनी या मंदिराचे महत्त्व आणि त्यासाठीचा संघर्ष मांडला. सूत्रसंचालन ॲड. सुशील अत्रे यांनी केले.
राम आदर्श एकात्मतेचे प्रतीक : डॉ. प्रसन्न पाटील
रामाची सामाजिक समरसता या मुद्द्यावर डॉ. प्रसन्न पाटील यांनी विचार मांडले. भारतात मंदिरे खूप आहेत. मग आणखी एक मंदिर का, असा प्रश्न अनेक जण विचारतात. मात्र, हे केवळ एक मंदिर नाही तर हा एकात्म राष्ट्र उभारणीचा आदर्श आहे. रामराज्याची पायाभरणी आहे. राम हा राष्ट्र या शब्दाला पर्याय म्हटल्यास कुणाचे दुमत नसावे, हे मंदिर एकराष्ट्र संकल्पनेला जोडणारे आहे आणि राम हे आदर्श एकात्मता जोडणारे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू राम यांनी सर्व जाती-धर्मांच्या माणसांना जवळ केले, सन्मान दिला. मात्र, रामाची ही शिकवण कालांतराने आपण विसरलो, असेही डॉ. पाटील म्हणाले.
स्त्री सुरक्षा म्हणजे रामराज्य : अनघा कुलकर्णी
राम मंदिर उभारणीत आणि संघर्षात महिलांची भूमिका या मुद्द्यावर अनघा कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले. प्रत्येक कार्याला बांधून घेण्याचे ज्ञान महिलांना उपजतच असते. हेच त्यांचे समाजासाठी मोठे योगदान. रामराज्य कसे असावे याचा प्रत्यक्षदर्शी घटक म्हणजे स्त्री. कारण ज्या राज्यात महिला सुरक्षित तेच रामराज्य, स्त्रियांनी कुटुंबातील जबाबदारी सांभाळून राष्ट्र मंदिर उभारणीत सहभाग नोंदविला आहे. त्या केवळ दशम्या बांधण्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. आंदोलनाच्या वेळीही कुटुंबाची वीस दिवसांची व्यवस्था करून महिला आठवडाभरापूर्वीच अयोध्येत दाखल झाल्या होत्या. तेथे त्यांनी सर्व आंदोलकांची भोजनाची व्यवस्था केली होती. महिला दुर्बल नाही, स्त्रियांचा रामराज्यात सन्मान राखला जातो म्हणून रामराज्य यावे आणि ते केवळ मंदिर उभारून नव्हे तर या मंदिराच्या प्रत्येक स्तंभाला निष्ठेचे आवरण आहे. त्यामुळे हे राष्ट्र मंदिर असल्याचे अनघा कुलकर्णी यांनी सांगितले.
रामजन्मभूमीसाठी १५२८ पासून संघर्ष : भंडारी
रामजन्मभूमी आणि राष्ट्र मंदिर उभारणी हा केवळ हिंदू धर्माचा आणि केवळ भाजपचा विषय असल्याचे सांगितले जाते. मात्र, खोटी माहिती पसरविण्याची ही सुनियोजित मोहीम असल्याचे माधव भंडारी यांनी सांगितले. राष्ट्रीय अस्मिता यावर त्यांनी विचार मांडले. १५२८ पासून रामजन्मभूमीसाठी संघर्ष सुरू झाला. त्या वेळी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणीच नव्हते. रामजन्मभूमीचा संघर्ष हा कधीच राजकीय नव्हता, तो आताही राजकीय नाही. १९४० ते १९८३ पर्यंत या आंदोलनाला राजकीय रंग नव्हताच. काँग्रेसचे काळजीवाहू पंतप्रधान राहिलेल्या गुलजारीलाल नंदा यांनी रामजन्मभूमी ठरावाला समर्थन दिले, रामजन्मभूमी आंदोलनाच्या व्यासपीठावर काँग्रेसचे मंत्री, आमदार होते. मात्र, १९९० पासून या आंदोलनाला डाव्या विचारसरणीचे लेखक, पत्रकार, कम्युनिस्ट यांनी राजकीय रंग दिला. मात्र, सत्य दडवून अपप्रचार करून. हा विषय कधी एका राजकीय पक्षाचा, संघटनेचा नव्हता. बाहेरच्या अनेक व्यक्तींनी राम हे भारताचा आत्मा असल्याचे म्हटले आहे. आम्हीही या आंदोलनात भाजप म्हणून नव्हे तर कारसेवक आणि रामसेवक म्हणून सहभागी झालो, असेही भंडारी यांनी सांगितले.
सर्व क्षेत्रांना पुरेसे संपूर्ण चरित्र म्हणजे राम : जनार्दन महाराज
राष्ट्र मंदिर उभारणीत साधुसंतांचा सहभाग आणि पुढे काय, या मुद्द्यावर महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभू राम यांचे चरित्र हे सर्व क्षेत्रांना पुरेसे आणि संपूर्ण असल्याचे ते म्हणाले. आदर्श जीवन जगण्यासाठी, आदर्श राष्ट्रनिर्मितीसाठी रामांचे हे चरित्र महत्त्वाचे आहे. रामांचे चरित्र हे आचरणीय आहे म्हणून राष्ट्र मंदिर उभारणी त्या अर्थाने महत्त्वाची ठरते. रामावरील श्रद्धेमुळे साधुसंतांनी या आंदोलनात सहभाग घेतला. न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत त्यांचा संघर्ष सुरूच होता. जेव्हा जेव्हा उत्सव, दैवत, संस्कृती यावर आघात झाला तेव्हा तेव्हा साधुसंतांनी पुढाकार घेऊन संघर्ष केला. साधूंनी चिमटा सोडलेला नाही. वेबसीरिजच्या माध्यमातून संस्कृतीवर घाला घातला जात असल्याचे ते म्हणाले. सर्व समावेशक अशी संतांची भूमिका राहिली आहे. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या संघर्षात साधुसंतांचा सिंहाचा वाटा राहिला आहे, असेही ते म्हणाले.