रमजान आणि व्यक्तिमत्त्व विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 09:30 PM2020-05-16T21:30:04+5:302020-05-16T21:30:31+5:30
मूळात रमजानचा महिनाच माणसाला चपळ बनवण्यासाठीच असतो. रोजा हा फारसी शब्द असून त्याचा अर्थ दिवस किंवा वार होतो. रोजा ...
मूळात रमजानचा महिनाच माणसाला चपळ बनवण्यासाठीच असतो. रोजा हा फारसी शब्द असून त्याचा अर्थ दिवस किंवा वार होतो. रोजा फक्त दिवसाच ठेवला जातो, रात्री नाही, म्हणून कदाचित त्यासाठी ह्यह्णदिवस (रोजा)ह्णह्ण शब्दप्रयोग केला गेला असेल. कुरआनात रोजा हा शब्द नसून मूळ अरबी शब्द सौम आहे. अरबस्थानात एखाद्या घोड्याला अधिक चपळ बनविण्यासाठी त्याला काही दिवस उपाशी ठेवले जायचे. त्या उपाशी घोड्याला फरजूस सौम (उपासधारक घोडा) म्हटलं जायचं. तो लांबच्या प्रवासासाठी किंवा युद्ध मोहिमेवर कामी येत असे. रमजानचा रोजादेखील कुणाच्या अंगात आळस असेल तर तो काढून त्याला चपळ बनवितो आणि कुणी चपळ असेल तर त्याला आणखी चपळ, चाणाक्ष बनवितो. कारण जास्त जेवण केल्याने स्थूलता वाढत असते, आळस येतो म्हणूनच परीक्षेला जातांना जास्त खाऊन जाऊ नये असं तज्ज्ञ सांगत असतात. चपळता हा एका चांगल्या व्यक्तिमत्त्वाचा नेहमीच एक अविभाज्य भाग असतो. चपळतेमध्ये जो सर्वात महत्त्वाचा गुण असायला पाहिजे तो म्हणजे वक्तशीरपणा. रमजानच्या सर्व उपासनांचे वेळापत्रक ठरलेले असते. फक्त रमजानच नव्हे तर इतर महिन्यातही नमाज ही वेळेवरच अदा करायची असते. परंतु रमजानमध्ये तराविह ही विशेष नमाज इमामांच्या नेतृत्वातच पढली जाते, कारण त्यात संपूर्ण कुरआन महिनाभर थोडे थोडे मुखोदगत केले जाते आणि संपूर्ण कुरआन प्रत्येकाला मुखोदगत नसते. म्हणून एकाच मशिदीत अगदी वेळेवर नमाजला हजर राहण्याचा अनेक जण प्रयत्न करत असतात. हा रमजानचा सगळा ताळेबंद हा महिना सुरु होण्यापूर्वीच ठरवावा लागतो, सगळं नियोजन करावं लागतं. यासाठी ह्यह्णइस्तेकबाल ए रमजान (रामजानचे स्वागत)ह्णह्ण म्हणून अनेक संघटना कार्यक्रम घेतले जातात. वक्तशीरपणा पाळणे, नियोजन करणे, सतत क्रियाशील राहणे, समय सूचकता पाळणे, कामात दिरंगाई, आळस न पाळणे, सकाळी लवकर उठणे हे संस्कार महिनाभर रोजाधारकांवर होत राहिल्याने त्याचं व्यक्तिमत्त्व उजळून निघते. ज्यांनी इमाने इतबारे पूर्ण रोजे ठेवून तराविह अदा केली, त्यांचं व्यक्तिमत्त्व ईदच्या दिवशी तेजाळलेले असते, इमानचे एक भारदस्त तेज त्यांच्या चेहºयावर दिसते. अशाप्रकारे रमजान व्यक्तिमत्त्व विकासातही योगदान देत असतो.
- सुहेल अमीर शेख, जळगाव.