जळगावात रमजान ईद उत्साहात, जोरदार पाऊस व एकात्मतेसाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:01 PM2018-06-17T12:01:21+5:302018-06-17T12:01:21+5:30
ईदचा अपूर्व उत्साह
जळगाव : जोरदार पाऊस पडू दे, सर्वत्र शांतता नांदो तसेच राष्ट्रीय एकात्मता वाढावी यासाठी रमजान ईदनिनित्त मुस्लीम बांधवांनी प्रार्थना केली. शनिवारी शहरात मजान ईद उत्साहात साजरी करण्यात येऊन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
ईदगाह व कब्रस्तान ट्रस्टतर्फे अजिंठा चौफुलीनजीकच्या ईदगाह मैदानावर रमजान ईदची नमाज पठण करण्यात आली. त्यात मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी सर्व मानव जातीला यशस्वी होऊ दे, शेती व पिण्यासाठी चांगला पाऊस पडू दे, विश्वामध्ये शांती लाभू दे अशी प्रार्थना मौलाना उस्मान कासमी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम बांधवांनी केली.
तत्पूर्वी ईदगाहचे विश्वस्त फारूक शेख यांनी मुफ्ती अतीकुर्रहमान यांचा परिचय करुन दिला. त्यानंतर विश्वशांतीसाठी ईदचे महत्त्व या विषयावर अर्धा तास मुफ्ती अतीकुर्रहमान यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक अब्दुल करीम सालार यांनी केले तर मौलाना उस्मान यांनी खुतबा व नमाज पठन केले. अमीन बदलिवाला यांनी आभार मानले.
ईदनिमित्त दिल्या शुभेच्छा
ईदनिमित्त आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, निरीक्षक अनिरुद्ध आढाव यांनी ईदगाह मैदान येथे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. मुस्लीम समाजातर्फे गफ्फार मलिक, करीम सालार, फारूक शेख, अमीन बदलीवाला, रागिब अहमद, रेहान जागीरदार, गनी मेमन, अॅड. आमिर शेख, शरीफ शेख, प्रा. डॉ इकबाल शाह, मुफ़्ती अतीकुर्रहमान यांनी मान्यवरांचे स्वागत करुन आभार मानले. या वेळी पिंप्राळा मशिदसाठी निधी जमा करण्यात आला.
बंधूभाव वाढू दे
सुन्नी ईदगाह ट्रस्टतर्फे नियाज अली नगर येथील ईदगाह मैदानावर मौलाना जाबीर रझा रझवी यांच्या नेतृत्वात नमाज पठण करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष अयाज अली नियाज अली यांनी प्रास्ताविक केले.
या वेळी मौलाना नजमूल हक यांनी नमाज पठणाची पद्धत या विषयी मार्गदर्शन केले. तसेच देशवासीयांचे शत्रूंपासून रक्षण कर, सर्वत्र शांती नांदो, बंधूभाव वाढू दे, बेरोजगारांना रोजगार दे अशी प्रार्थना केली. सलातो सलाम मौलाना जुबेर आलम यांनी म्हटले.
या प्रसंगी मुफ्ती मौलाना रेहान रजा अशरफी, मौलाना मुफ्ती इन्तेखाब अशरफ, मौलाना जुबेर आलम, मौलाना अब्दुल रहीम, इकबाल वजीर, शाकीर मेमन, मुक्तार शाह, मौलाना अ. हमीद, मौलाना अलीम यांच्यासह हजारो मुस्लीम बांधव उपस्थित होते.
ईदचा अपूर्व उत्साह
ईदनिमित्त सकाळपासूनच समाजबांधवांमध्ये मोठा उत्साह होता. नमाज पठणासाठी आलेल्या सर्व अबालवृद्धांनी नवीन वस्त्र परिधान करून नमाज पठण केल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या सोबतच नंतरही घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. समाजबांधवांतर्फे शिरखुम्यासाठी निमंत्रण देण्यात येऊन हिंदूबांधवांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.