रामदेववाडी अपघात, तिघांचा जामीन अर्ज फेटाळला
By सुनील पाटील | Published: June 3, 2024 01:53 PM2024-06-03T13:53:03+5:302024-06-03T13:53:41+5:30
कारागृहातील मुक्काम वाढला : संशियत नंदूरबार कारागृहात
सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : रामदेववाडी अपघात प्रकरणात अटकेतील अर्णव अभिषेक कौल (वय १९, रा.जय नगर), अखिलेश संजय पवार (वय १९,रा.गणेश कॉलनी) व ध्रुव नीलेश सोनवणे (वय १९, रा.गायत्री नगर) या तिघांचा जामीन अर्ज सोमवारी न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे तिघांचा कारागृहातील मुक्काम अजून वाढला आहे. जळगाव कारागृह फुल्ल असल्याने सध्या तिघं संशयित नंदूरबार कारागृहात आहेत.
तालुक्यातील रामदेववाडी येथे ७ मे रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता भरधाव कारने दुचाकीवरील वच्छलाबाई सरदार चव्हाण (वय २५), मुलगा सोहम (वय १०), सोमेश (वय ३) सर्व रा. रामदेववाडी व भाचा लक्ष्मण पदम नाईक (वय १७,रा.मालखेडा, ता.जामनेर) या चौघांना चिरडल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयत वच्छलाबाई चव्हाण यांचा भाऊ राजेश आलमसिंग चव्हाण (रा.रामदेववाडी) याच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवध, अपघात व अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. १७ दिवसानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली होती.
तिघांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बी.एस.वावरे यांच्याकडे एक दिवस नंतर न्या.जे.जे.मोहिते यांच्या न्यायालयात शनिवारी युक्तीवाद झाला होता. न्यायालयाने सरकारी वकील पंढरीनाथ चौधरी व बचाव पक्षाची बाजू जाणून घेत सोमवारी तिघांचे जामीन अर्ज फेटाळले.