धरणगावला रामलीलेची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:03 AM2018-04-18T11:03:35+5:302018-04-18T11:03:35+5:30
शरदकुमार बन्सी / आॅनलाइन लोकमत
धरणगाव, जि. जळगाव, दि. १८ - धरणाव येथील सावता माळी समाज सुधारणा मंडळ संचलित रामलीला मंडळ गेल्या ८२ वर्षांपासून वाल्मीकी रामायणाचा आध्यात्मिक जागर करीत आहे. मोठा माळी वाड्यातील अल्पशिक्षित शेतकरी व शेतमजूर या रामायणाचे सादरीकरण करून चार दिवस प्रेक्षकांना वाल्मीकी रामायणातील ऐतिहासिक प्रसंगांची आठवण करून देतात. पंचक्रोशीत रामलीला मंडळातर्फे सादर केला जाणारा हा सांस्कृतिक उपक्रम शहराच्या लौकिकात भर पाडणारा असा उपक्रम आहे. अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधून धरणगावच्या मोठ्या माळी वाड्यात चार रात्र हा उत्सव असतो. रामकृष्ण माळी (राम), जयराम माळी (लक्ष्मण), जनार्दन माळी (सीता), जगन्नाथ महाजन (राजा जनक), पंढरीनाथ महाजन (राजा दशरथ), मनोज माळी (परशुराम), देवा माळी (विश्वामित्र), दीपक महाजन (हनुमंत), गुलाब भिकारी माळी (कैकयी), दामाजी सदू माळी, देवीदास अंबादास माळी (जंबू माळी), यासह इतर कलावंत यात सहभागी असतात. या रामलीला मंडळाचे अध्यक्ष आॅर्डनन्स फॅक्टरीचे सेवानिवृत्त अधिकारी रूपा बुधा महाजन हे आहेत. तर उपाध्यक्ष हरिनाथ किसन महाजन तर सचिव म्हणून आबा सोमा माळी व सहसचिव म्हणून कृपाराम सखाराम माळी हे काम पाहत आहेत.