शॉर्टकटसाठी राँगसाइड चुकीचीच; ही वेळ बचत जीवघेणी ठरू शकते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:27+5:302021-06-28T04:12:27+5:30
कुणी गमावला जीव तर कोणी गमावले अवयव जळगाव : इच्छितस्थळी लवकर पोहोचण्याच्या नादात अनेक जण शॉर्टकट म्हणून राँगसाइडचा ...
कुणी गमावला जीव तर कोणी गमावले अवयव
जळगाव : इच्छितस्थळी लवकर पोहोचण्याच्या नादात अनेक जण शॉर्टकट म्हणून राँगसाइडचा वापर करतात. मात्र, ही वेळ बचतच जीवघेणी ठरू शकते. किंबहुना अशा प्रकारे वाहन चालविणाऱ्या अनेकांचे जीव गेलेले आहेत, तर अनेकांना अपघात होऊन त्यांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झालेले आहेत. शहरात जिल्हा क्रीडा संकुल, स्वातंत्र्य चौक, सागर पार्कसमोरील रस्ता, शिवाजीनगर, फुले मार्केट आदी भागात राँगसाइड जाणाऱ्यांची संख्या खूप आहे.
राँगसाइड वाहन चालविणे नियमांचे उल्लंघन तर आहेच. मात्र, त्याहूनही अधिक धोकादायक आहेत. आपण चुकीचे करतोय हे प्रत्येकाला कळत असले तरी ती चूक जाणीवपूर्वक केली जाते. थोड्या वेळेची बचत होते म्हणून जीवच धोक्यात घातला जात आहे. अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलेली आहे.
गेल्या वर्षभरात झालेले अपघात -७२१
मृत्यू -४७१
जखमी -३७७
राँगसाइडमुळे झालेले अपघात - २१२
मृत्यू -६५
जखमी -११२
अ) स्वातंत्र्य चौक परिसर
स्वातंत्र्य चौक परिसरात सर्वात जास्त राँगसाइड वाहनांचा वापर होताे. भास्कर मार्केट परिसराकडून आलेले वाहनधारक जिल्हाधिकारी कार्यालय व बांधकाम उपविभाग, पाणीपुरवठा, लाचलुचपत प्रतिबंधक आदी विभागात जाण्याकरिता राँगसाइडचाच वापर करतात. चौक ओलांडून जाण्याची तसदी घेतली जात नाही. यात जिल्हाधिकारी कार्यालय व इंडिया गॅरेज या ठिकाणी नेहमीच अपघात होतात.
ब) अपर पोलीस अधीक्षकांचे निवासस्थान
अपर पोलीस अधीक्षक यांच्या शासकीय निवासस्थानासमोरून नेहमीच दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने राँगसाइडने पेट्रोल पंपावर जातात. जीएसटी व विक्रीकर भवनाकडे जाणाऱ्या चौकातून वळण घेऊन ही वाहने थेट अपर पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानासमोरून पेट्रोलपंपाकडे वळतात. दीड महिन्यापूर्वीच या चौकात कार व दुचाकीचा अपघात झाला होता. त्याशिवाय तीन वर्षांपूर्वी एका महिलेचा मृत्यूही झालेला आहे.
क) जिल्हा क्रीडा संकुल
जिल्हा क्रीडा संकुलाकडून क्रीडा संकुलात, पोलीस लाइन, पोलीस कवायत मैदान त्याशिवाय पाणीपुरी, पावभाजी खाणारे नेहमीच राँगसाइडने जातात. रिंग रोडकडून आलेले वाहनधारक रस्ता ओलांडण्याची तसदी घेत नाहीत. बी.जे. मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळण घेताना या ठिकाणी अपघात झालेला आहे. खास करून सायंकाळच्या वेळी या ठिकाणी अपघात झालेले आहेत.
पाच महिन्यांत एक लाखाचा दंड
राँगसाइड वाहन चालविणाऱ्या १११ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई जानेवारी ते मे या पाच महिन्यांतील असून फक्त शहर वाहतूक शाखेची व शहरातीलच आहे.
कोट...
शहरात राँगसाइडचा वापर करणाऱ्यांची संख्या आता वाढत चालली आहे. दंडात्मक कारवाई केली तरी वाहनधारक जुमानत नाहीत. कायद्याने पोलीस नियमानुसारच कारवाई करू शकतो. मात्र, अपघात झाल्यास ती मोठी हानी असून कधीही भरून निघू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: व कुटुंबाची काळजी म्हणून तरी नियमांचे पालन करावे.
-देवीदास कुनगर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा