हॉटेल सुरू ठेवण्यासाठी खंडणीची मागणी, दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 09:39 PM2021-03-01T21:39:08+5:302021-03-01T21:39:29+5:30
मराठा दरबार हॉटेल मालकाला हॉटेल सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : तालुक्यातील भोरस खुर्द शिवारातील धुळे रोडवर असलेल्या मराठा दरबार हॉटेल मालकाला हॉटेल सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागणाऱ्या दोघांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जयेश दत्तात्रय शिंदे (भोरस खुर्द़ ता. चाळीसगाव) यांचे धुळे रोडवर मराठा दरबार नावाचे हॉटेल आहे. गावातील करण ऊर्फ बंटी अनिल पाटील आणि सचिन सुनील पाटील (दोन्ही भोरस, ता. चाळीसगाव) यांनी २८ रोजी रात्री ९ वाजता हॉटेलवर येऊन धमकी दिली की, तुला जर हॉटेल चालवायचे असेल तर दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणी द्यावी लागेल.
पैसे देण्यास जयेश शिंदे यांनी नकार दिल्यावर बंटी आणि सचिन यांनी दगडाने मारहाण करून गल्ल्यातील १७ हजार ५०० रुपये जबरीने काढून घेतले. तसेच जयेश शिंदे यांना तलवारीने ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जयेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.