जागा खाली करण्यासाठी कंडारेच्या हस्तकांकडून खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:13 AM2020-12-09T04:13:00+5:302020-12-09T04:13:00+5:30
जळगाव : बीएचआर संस्थेच्या शाखा बंद पडल्यानंतर भाडेतत्वावरील जागा परत करण्यासाठी मूळ मालकांकडून कंडारेच्या हस्तकांनी लाखो रुपयांची खंडणी वसुल ...
जळगाव : बीएचआर संस्थेच्या शाखा बंद पडल्यानंतर भाडेतत्वावरील जागा परत करण्यासाठी मूळ मालकांकडून कंडारेच्या हस्तकांनी लाखो रुपयांची खंडणी वसुल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
बीएचआर संस्था अवसायनात गेल्यामुळे केंद्र सरकारच्या सहकार विभागाने जितेंद्र कंडारे याची अवसायक म्हणून संस्थेवर निवड केली. निवड झाल्याबरोबर कंडारे याने संस्थेच्या मालकीच्या किती शाखा आहेत, किती शाखेवर स्वमालकी आहे व किती भाड्याच्या जागेत सुरु आहेत याची माहिती काढली.
संस्थेच्या मालमत्तेच्या जागा बनावट वेबसाईट तयार करुन कवडीमोल भावात जवळच्या व्यक्तींना विक्री केल्याचा सपाटा लावल्यानंतर त्याच्यासोबतच भाड्याच्या जागा खाली करण्यासाठी मुळ मालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून लाखो रुपये खंडणीच्या स्वरुपात रक्कम घेतली जात होती. त्यासाठी कंडारे याने कार्यालयात काम करणारा जवळच्या व्यक्तीला हस्तक नेमले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अशी होती एमओबी
बीएचआर संस्थेला शाखा सुरु करण्यासाठी मालकांनी १० ते १५ वर्षाचा करार केलेला होता. या करारामुळे संस्था व मालक एकमेकांशी बांधील होते. मात्र मध्येच संस्था अवसायनात गेल्याने संस्थेच्या सर्व २६४ शाखा बंद करण्यात आल्या. त्यामुळे जागा मालकांचे भाडेदेखील थांबले. दुसऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला जागा भाड्याने द्यायची असल्यास त्यासाठी बीएचआरने जागा खाली करणे अपेक्षित होते. मालक प्रशासकांकडे जावून जागा खाली करण्याची विनंती करीत होते.
तेव्हा कंडारे अमूक व्यक्तीला भेटा, त्याच्याकडे हे काम सोपविले आहे, असे सांगायचा. या व्यक्तीला भेटल्यानंतर तुम्ही करार केला आहे. त्यामुळे कराराची मुदत संपेपर्यंत जागा संस्थेच्या ताब्यातच राहिल. त्याशिवाय न्यायालयीन प्रक्रियेचा हा भाग होईल, त्यामुळे तुम्हाला जागा खाली करुन मिळणार नाही असे सांगितले जायचे.
मालकाने एक दोन वेळा चकरा मारल्यानंतर विशिष्ट रक्कम दिल्यानंतर जागा खाली करुन देतो, असे या हस्तकामार्फत जागा मालकापर्यंत निरोप दिला जायचा. मालकही कोर्ट कचेरीची भानगड, त्याशिवाय जागा मिळाल्यास आजच उत्पन्न सुरु होईल, या विचाराने हस्तकाची मागणी पूर्ण केली जायची. त्यानुसार १ ते ३ लाखापर्यंतची रक्कम घेऊन संस्था जागा खाली करुन देत होते.