पीडितेने मांडली न्यायालयात स्वतःची बाजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 09:03 PM2021-03-16T21:03:06+5:302021-03-16T21:03:40+5:30
बँक मॅनेजरचा जामीन फेटाळला : अत्याचाराचा वाचला पाढा
जळगाव : स्टेट बँकेचा मॅनेजर अशोक सीताराम शर्मा (रा. मुंबई) याने सुटीच्या दिवशी बँकेतच अत्याचार केला. त्यानंतर आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी देत सलग तीन वर्षे अत्याचार केला त्याशिवाय त्याचा मित्र दुर्गादास यानेही आक्षेपार्ह पोस्ट अपलोड करुन मानसिक खच्चीकरण व बदनामी कशी केली याचा पाढा पीडित महिलेने मंगळवारी स्वत: न्यायालयात वाचला. त्यानंतर न्यायालयाने शर्मा याची जामीन अर्ज फेटाळून लावला.
स्टेट बँकेच्या शिव कॉलनी शाखेतील व्यवस्थापक अशोक सीताराम शर्मा (रा. मुंबई) याने कर्जासंदर्भात माहिती घेण्यासाठी आलेल्या ३८ वर्षीय महिलेवर सुटीच्या दिवशी बँकेतच अत्याचार केल्याचा गुन्हा १५ फेब्रुवारीला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या गुन्ह्यातअत्याचार व अॅट्रासिटीचेही कलम लावण्यात आले आहे. संशयित शर्मा हा कारागृहात आहे, त्याने न्या.एस.जी ठुबे यांच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर मंगळवारी कामकाज झाले. संशयिताच्या वकिलांनी महिलेने दिलेली फिर्याद खोटी असून संबंधित महिला खंडणी मागत असल्याचे म्हटले. त्यावर पीडित महिलेने आपला खुलासा स्वतः सादर करण्याची परवानगी जिल्हा न्यायाधीशांकडे मागितली. त्यावर न्यायालयाने पिडीत महिलेस परवानगी दिली. त्यानंतर पिडीतेने आपल्यावरील आरोप खोडून काढत शर्मा याने निंभोरा पोलीसात २४ नोव्हेंबर २०२० ला खंडणीचा अर्ज दिला आहे. त्याबाबत अनेक प्रश्न असून कुठलीही स्पष्टता तसेच अर्ज दिल्याची सत्यप्रत नाही. त्यामुळे बलात्कार झाल्याचे खोटे असल्यास त्यांनी सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात दाखल करावेत, असे देखील पिडीत महिलेने सांगितले. जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांनी पीडीतेची बाजू मांडली.