लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:57 PM2020-09-07T23:57:43+5:302020-09-07T23:58:10+5:30
आरोग्य कर्मचाऱ्याविरुध्द गुन्हा
जळगाव : परिस्थितीचा गैरफायदा व लग्नाचे आमिष दाखवून ४० वर्षीय विवाहितेवर सतत सात वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी विश्वनाथ जनार्दन सावकारे (५०, रा. अर्जुन नगर) याच्याविरुध्द सोमवारी रात्री रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावकारे हा म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर म्हणून नोकरीला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१३ या वर्षी पीडिता व विश्वनाथ सावकारे यांची रेशन कार्ड काढण्याच्या निमित्ताने ओळख झाली. त्यावेळी पीडितेने माझा घटस्फोट झाला असून १२ वर्षाची मुलगी आहे, असे सांगितले. त्यावर सावकारे याने माझाही घटस्फोट झाला असून एकटाच राहतो असे सांगून लग्नाचे आमिष दाखविले व एकत्र वास्तव्य करु लागला होता.
घर सोडण्यासाठी पाठविली नोटीस
दरम्यान, २०१६ मध्ये राहते घर विक्री करुन हरिविठ्ठल नगरात सावकारे वास्तव्याला गेला. हे घर घेण्यासाठी आपणही पैसे दिले होते असे पीडितेचे म्हणणे आहे. त्यावरुन त्याने वाद केला व ‘तु माझी बायको नाही, तुझ्या सारख्या माझ्या भरपूर बायका आहेत’असे म्हणत छळ करीत राहिला. आज ना उद्या कायदेशीर लग्न करेल या आशेवर सर्व सहन केले. ८ जून २०२० पासून सावकारे हा पीडितेला सोडून निघून गेला व राहते घर सोडावे म्हणून वकीलामार्फत नोटीस पाठवून न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. या साºया प्रकाराला कंटाळून पीडितेने सोमवारी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून बलात्कार व गर्भपात केल्याचा गुन्हा तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडितेचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला.