रावेर येथे प्रसादरूपी रेवड्यांची उधळण अन् तरुणांच्या अपूर्व उत्साहात श्री दत्तकृष्ण रथाची परिक्रमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 07:49 PM2018-12-23T19:49:56+5:302018-12-23T19:52:13+5:30
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘हाथी घोडा पालखी जय कन्हैयालाल की’, ‘अवधूत चिंतन गुरूदेवदत्त महाराज की जय’, ‘गोपालकृष्ण भगवान की जय’ अशा भक्तीच्या जयघोषात व ‘रेवडी... रेवडी...’ची आर्त हाक देत, रेवड्यांच्या उधळणीने वृद्धींगत झालेल्या अपूर्व उत्साहातील खच्चून भरलेल्या रस्त्यांवरील तरूणाईने भगव्या ध्वजपताका व पुष्पवेलींच्या माळांनी सुशोभित केलेल्या श्री दत्त-कृष्ण रथाला ओढत शहराला तब्बल १० तासांची १८१ वी नगरप्रदक्षिणा मोठ्या भावभक्तीने आज पूर्ण केली.
किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘हाथी घोडा पालखी जय कन्हैयालाल की’, ‘अवधूत चिंतन गुरूदेवदत्त महाराज की जय’, ‘गोपालकृष्ण भगवान की जय’ अशा भक्तीच्या जयघोषात व ‘रेवडी... रेवडी...’ची आर्त हाक देत, रेवड्यांच्या उधळणीने वृद्धींगत झालेल्या अपूर्व उत्साहातील खच्चून भरलेल्या रस्त्यांवरील तरूणाईने भगव्या ध्वजपताका व पुष्पवेलींच्या माळांनी सुशोभित केलेल्या श्री दत्त-कृष्ण रथाला ओढत शहराला तब्बल १० तासांची १८१ वी नगरप्रदक्षिणा मोठ्या भावभक्तीने आज पूर्ण केली. इस्कॉन भजनी मंडळाच्या श्री राधा-कृष्ण व श्री राम-कृष्णनामाच्या सुरेल भजनांच्या तालात दत्त-कृष्णभक्तांनी रथोत्सवातून ओसंडून वाहणाऱ्या आत्मानंदाची आत्मानुभूती घेतली. साक्षात श्री दत्तस्वरूप सद्गुरू श्री सच्चिदानंद स्वामी महाराज यांनी उभारलेल्या प्रतिगाणगापूर स्वरूप नाला भागात उभारलेल्या श्री दत्तमंदिरातून मंगल वाद्यांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेतून ऋषिकेश कुलकर्णी व श्रुती कुलकर्णी यांनी सपत्नीक डोईवर श्री दत्तप्रभुंच्या निर्गुण पादुका तर नित्यनाथ राजगुरू यांच्या डोईवर भगवान गोपालकृष्णाची मूर्ती रथापर्यंत आणण्यात आल्या. तद्नंतर, मंदिराचे पाचवे गादीपती श्रीपाद महाराजांचे सुपुत्र श्री.रं.कुलकर्णी यांच्या हस्ते सपत्नीक श्रीगणेश, भगवान गोपालकृष्णाची व श्री दत्तप्रभुंच्या निर्गुण पादुकांची रथात प्रतिष्ठापना करून, या देवदेवतांसह अश्व, सारथी, रथाची चाके, मोगरी बनवण्यासाठी वापरलेली सुतारी अवजारांचे पूजन करण्यात आले. संजय मटकरी व आशिष कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.
दरम्यान, नगराध्यक्ष दारा मोहंमद, उपनगराध्यक्ष संगीता वाणी यांच्यासह उपस्थित नगरसेवकांना, श्री दत्तप्रभुंना रावेरात आणणाºया अग्रवाल परिवारातील सतीश अग्रवाल, जी. पी. अग्रवाल, सुधीर अग्रवाल, सुनील अग्रवाल, वाणी परिवारातील बापू वाणी, अवधूत वाणी व परंपरागत मोगरी लावण्याची सेवा बजावणारे कैलास कासार , मंगेश कासार, नीलेश पाटील, भूषण कासार, दिलीप कासार, मुकेश पाटील, प्रवीण पाटील, संदीप कासार,मनसुकलाल लोहार,देविदास वाणी, धनंजय वाणी आदी सेवेकºयांंचा सुहृद्य सत्कार करण्यात आला. याचप्रसंगी मुस्लीम पंचकमेटीतर्फे गयास शेख, नगरसेवक आसिफ मोहंमद, सादीक शेख, असदुल्ला खान, युसूफ खान, अॅड. एम.ए.खान, समद शेख, अय्युबखाँ भुरेखाँ पठाण आदींनी पाचवे गादीपती श्रीपाद महाराज व मोगरीची सेवा बजावणाºया सेवेकरींचा सत्कार केला.
दरम्यान, भगवान गोपालकृष्णाची व श्री दत्तप्रभुंची आरती झाल्यानंतर पाचवे गादीपती श्रीपाद महाराज यांनी रथासमोर नतमस्तक होऊन ‘अवधूत चिंतन् गुरूदेवदत्त महाराज की जय,’ ‘गोपालकृष्ण भगवान की जय’ असा जयघोष करीत रथ ओढणाºया भक्तांना अनुमती दिली. रथचौकातून दुपारी तीन वाजता प्रस्थान झाले. रथोत्सवाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी श्री क्षेत्र पंढरपूर, मुक्ताईनगर, बोदवड, शेलवड, फैजपूर, लोणी येथील इस्कॉन भजनी मंडळाच्या महिला- पुरूष भक्तांनी ‘गोपाला.. गोपाला रे, प्यारे नंदलाला’ ‘हरे कृष्णा हरे रामा...’च्या सुरेल तालावर सादर केलेल्या भजनांनी मिरवणुकीचे लक्ष वेधून घेत रथोत्सवातील तरूणाईला भक्तीसंगीतावर ताल धरण्यास प्रवृत्त केले.
रथचौकातून आरंभी काही महिला भाविक भक्तांनीही रथ ओढण्याची सेवा भगवान श्रीकृष्ण व श्री दत्तप्रभुंच्या चरणी समर्पित केली. रथचौक ते भोईगल्लीत दाखल होईपावेतो असलेल्या तीन ते चार काटकोनातील वळणावर तरूणाईच्या अपुर्व उत्साहात ओढल्या जाणाºया रथाच्या पुढील व मागील चारही अवजड चाकांना प्रसंगावधान राखून मोगरीच्या साह्याने कैलास कासार, मंगेश कासार, नीलेश पाटील, भूषण कासार, दिलीप कासार, मुकेश पाटील, प्रवीण पाटील, संदीप कासार या काही नवोदित व जुन्या सेवेकरींनी रथाचे यशस्वीरित्या मार्गाक्रमण केले.
मनमोहक अशा पुष्पवेलींनी, भगव्या ध्वजपताकांनी व रंगीबेरंगी फुग्यांनी सुशोभित केलेल्या २१ फूट उंच तथा चहूबाजूंनी खाली-वर असलेल्या १६४ घंट्यांच्या निनादात मार्गस्थ होणाºया रथातील अष्टभूजा असलेल्या देव्हाºयात प्रतिष्ठापना केलेली श्री भगवान कृष्णप्रभूंची मनमोहक व सगुण अशी मूर्ती व श्री दत्तप्रभुंच्या निर्गुुुण पादुका भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरल्या. हेमंत फुल भांडारचे सुनील फुलारी यांनी ही रथ सजावटीची सेवा बजावली.
रथ परिक्रमेच्या मार्गात घराघरातून सुवासिनींनी भगवान गोपालकृष्ण व श्री दत्तप्रभुंच्या निर्गुण पादुकांचे औक्षण करून दर्शनाचा लाभ घेतला. तद्वतच, घराघरातील गच्च्यांवरून व गॅलरींमधून रथावर उधळण्यात येणाºया स्नेह, माधुर्य, तथा उर्जावर्धक प्रसादरूपी रेवडीसाठी रेवडी.. रेवडी... रेवडी... अशी आर्त साद घालणाºया व रथ ओढण्याची सेवा समर्पित करणाºया तरूणाईवर ठिकठिकाणी रेवड्यांची उधळण झाली असता तरूणाईची एकच झुंबड उडाली होती. या रथचौकातून भोईगल्ली, महात्मा गांधी चौक, हेडगेवार चौक, मेनरोड, नालाभाग, चावडी, नागझिरी चौक, महात्मा फुले चौक, श्री स्वामी विवेकानंद चौक, पाराचा गणपती ते थेट लालबहादूर शास्त्री चौकापर्यंत रथाची परिक्रमा पूर्ण करताना लाखो तरूणाईच्या अपूर्व उत्साहाने रात्री बारापर्यंत नऊ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महात्मा गांधी चौकापासून ते नागझिरीपर्यंत व नागझिरीपासून ते रथचौकापर्यंत रथोत्सव सोहळा पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी शहरातील व परिसरातून तथा घराघरात आलेल्या यजमान महिलांची रस्त्याच्या दुतर्फा खच्चून गर्दी झाली होती. लाखो भाविकांची फुललेली मांदियाळी व रस्त्यावर खेळणी, मिष्टान्न भांडार व रेवड्यांच्या थाटलेल्या दुकानांनी यात्रोत्सवात नवचैतन्याचा बहर आला होता.
पो.नि.रामदास वाकोडे, स.पो.नि. शिवाजी पाळदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य राखीव दलाची, जिल्हा नियंत्रण पोलीस दलाची राखीव तुकडी व स्थानिक पोलीस बलासह होमगार्डचा बंदोबस्त लावण्यात आला होता. तहसीलदार विजयकुमार ढगे, मंडळाधिकारी एम.जे.खारे व तलाठी डी.व्ही.कांबळे परिस्थितीवर नियंत्रण राखून होते.
रावेरला आज पालखी सोहळा
श्री दत्त मंदिरातून सद्गुरू स्वामी सच्चिदानंद महाराजांचा मेणा व श्री विठ्ठल-रूख्मिणीच्या मूर्तीचा पालखी सोहळा सोमवारी सायंकाळी पाच वाजता काढण्यात येणार आहे. तद्वतच, सायंकाळी आठवडे बाजार चौकात पालखी सोहळ्यातून येणाºया गोविंदाच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात येणार आहे. रात्री नयनरम्य अशा अवकाशातील चित्ताकर्षक रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, दुपारी सरदार जी.जी. हायस्कूल मैदानात श्री अंबिका व्यायामशाळेच्या माध्यमातून खुल्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तद्वतच, सकाळी साडेदहा वाजता चितोडे वाणी समाज वधू वर परिचय मेळावा श्री बालाजी मंदिरात होत आहे.