इंद्रधनुषी देशात डोकावताना असाही अनोखा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 04:07 PM2018-02-11T16:07:55+5:302018-02-11T16:08:26+5:30
दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन विभागाने पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या अभ्यास दौºयात ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी हे सहभागी झाले होते. २९ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१७ या कालावधीत हा अभ्यास दौरा झाला. या प्रवासात दिसलेला आफ्रिका देश, तेथील जंगले, निसर्गसौंदर्य, बिग फाईव्हसह वन्यपशु-पक्षी, तेथील संस्कृती, माणसे याविषयी लिहित आहेत...
महात्मा गांधी यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात जिथून झाली, नेल्सन मंडेला यांच्यासारखा महामानव जिथे जन्माला आला, श्वेतवर्णीयांच्या अन्याय-अत्याचाराला तोंड देत कृष्णवर्णीयांनी लढा दिला, जंगले-पशु-पक्षी, जैवविविधता असलेला देश अशी सर्वसामान्यांना असते तशी साधारण माहिती दक्षिण आफ्रिकेविषयी मला होती. अभ्यास दौºयावर जाण्यापूर्वी एक-दोन पुस्तके, इंटरनेटद्वारे आफ्रिका समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा देखील झाला.
दक्षिण आफ्रिकेतील नितांतसुंदर पर्यटनस्थळे, या स्थळांच्या ठिकाणी असलेली पायाभूत सुविधा, पर्यटनवाढीच्यादृष्टीने साहसी प्रकारांच्या आकर्षणासह सुरू असलेले प्रयत्न याची माहिती मराठी पत्रकारांना व्हावी, या हेतूने या दौºयाचे आयोजन तेथील पर्यटन विभागातर्फे करण्यात आले होते. महाराष्टÑातील सहा पत्रकारांचा या दौºयात समावेश होता.
मुंबईहून माहे आयलंडमार्गे आम्ही जोहान्सबर्गला पोहोचलो. जोहान्सबर्ग, जॉर्ज आणि केपटाऊन ही तीन प्रमुख शहरे, नायस्रा, आऊटश्रून, रॉबर्टसन, स्टेलनबोश, फान्सहोक, हर्मानस या छोट्या शहरांना आणि पिलानीसबर्ग अभ्यारण्याला भेटी दिल्या. मानवी उत्क्रांतीची भूमी असलेल्या या देशात आदिमानवांच्या गुफांचे जतन व संवर्धन केले आहे.
श्वेतवर्णीय, कृष्णवर्णीय, संमिश्र वर्ण, आणि तपकिरी रंगाचे भारतीय, पाकिस्तानी, चिनी आणि अन्य आशियाई देशातील नागरिक असे चार वर्णाचे नागरिक गुण्यागोविंदाने येथे राहत आहेत. कष्ट आणि जिद्दीने देश घडवित असल्याने त्याला ‘रेनबो नेशन’ (इंद्रधनुषी देश) असे म्हटले जाते.
दक्षिण आफ्रिकेतील माणसे आनंदी, उत्साही आणि गीत-संगीतावर निस्सीम प्रेम करणारे आहेत. निसर्गातील सर्वच घटकांचा आदर करीत पूर्वजांचा वारसा जपण्याचा प्रयत्न आफ्रिकन लोक प्राणपणाने करीत आहेत.
अभयारण्यातील दोन दिवसांचा मुक्काम, सिंह, गेंडा, रेडा, हत्ती व चिता या बिग फाईव्हपैकी चौघा राष्टÑीय प्राण्यांचे दर्शन, मानववंशाचा पाळणा म्हटल्या गेलेल्या या देशात आदिवामानवांचे अवशेष व त्या काळातील वातावरणाचे कांगो केव्हसह इतर परिसरात केलेले जतन, साहसी प्रकारातील बंजी जम्प, हॉट बलून सफारी, झीप लाईनींग, हेलीकॉप्टर राईड, शार्क केज राईड, हिंदी महासागरातील वादळी नौका प्रवास, आफ्रिकेतील पारंपरिक संगीत, हस्तकला, शहामृग, झेब्रा आदी प्राण्यांच्या कातडी, अंड्यांपासून बनविलेल्या कलाकृती, संपूर्ण विदेशाच्या धर्तीवर वसविलेले सनसिटी असा रोमांचकारी, थरारक आणि आनंददायी अनुभव या ११ दिवसांमध्ये आला.
भारत आणि आफ्रिकेचे ऋणानुबंध आहेत. सुमारे १८६० मध्ये डर्बन येथे भारतीय पहिल्यांदा आले. अनेक पिढ्यांपासून राहणारे भारतीय तिथल्या संस्कृतीशी एकरुप झालेले असले तरी दिवाळी, होळीसारखे सण धूमधडाक्यात साजरे होतात.
भारतीयांची स्वतंत्र रेस्टॉरंट आहेत. तेथे डोसा, उत्तपापासून जिरा राईसपर्यंत भारतीय खाद्यपदार्थ मिळतात. भारतीय, पाकिस्तानी मंडळी इतर व्यवसायात बºयापैकी आहेत. प्रिटोरीया जाता न आल्याने तेथील गांधी स्क्वेअर आणि गांधी आश्रम बघायचा राहून गेला.
या देशात अलौकिक मिश्रण दिसून येते. जोहान्सबर्ग आणि केपटाऊन या दोन प्रमुख शहरांची रचना आणि जीवनशैली अत्याधुनिक आहे, तर अब्जावधी वर्षांपूर्वी तयार झालेल्या गूढ गुहा, वन्यप्रदेश यांचे जतन व संवर्धन केले आहे.
(क्रमश.)