महाराष्ट्रात प्रथमच दुर्मीळ फायकस लेकॉर वनस्पतीची नोंद, वनस्पती अभ्यासक डॉ.तन्वीर खान व रेवन चौधरी यांचे यश
By Ajay.patil | Published: July 18, 2023 02:36 PM2023-07-18T14:36:28+5:302023-07-18T14:37:04+5:30
Jalgaon: जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या सातपुड्यात पुन्हा एकदा अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘फायकस लेकॉर’ या दुर्मीळ वनस्पतीची नोंद करण्यात आली
- अजय पाटील
जळगाव - जिल्ह्याला लागून असलेल्या सातपुड्यात पुन्हा एकदा अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘फायकस लेकॉर’ या दुर्मीळ वनस्पतीची नोंद करण्यात आली असून, महाराष्ट्रात फायकस लेकॉर या वनस्पतीची प्रथमच नोंद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. जळगावातील एच.जे.थीम महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा वनस्पती अभ्यासक डॉ.तन्वीर खान व त्यांचे सहकारी रेवन चौधरी यांनी ही नोंद केली आहे.
सातपुड्यात आतापर्यंत संपुर्ण भारतात व महाराष्ट्रात देखील अंत्यंत दुर्मीळ असलेल्या अनेक वन्सपतींची नोंद वनस्पती अभ्यासकांकडून करण्यात आली आहे. त्यात आता ‘फायकस लेकॉर’ या वनस्पतीची भर पडली आहे. फायकस या वनस्पतीच्या भारतात एकूण ११५ प्रजाती आहेत. त्यात महाराष्ट्रात २२ प्रजाती आढळून येतात. त्यात आता फायकस लेकॉर या वनस्पतीची भर पडली आहे. या वनस्पतीच्या पृष्ठीकरणासाठी डॉ.खान व चौधरी यांनी भोपाल येथील वनस्पती अभ्यासक डॉ.पी.सी.दुबे व आंध्र प्रदेशातील डॉ.सुधाकर यांना पाठविले असता, त्यांनीही या नोंदीला दुजोरा दिला आहे. तसेच डॉ.तन्वीर खान यांनी लिहीलेला शोधनिबंध ‘इंडियन फॉरेस्ट’ या विज्ञान पत्रिकेत प्रकाशीत झाला आहे. यासाठी त्यांना मुजफ्फर शेख, उमेश पाटील, अजहर शेख यांचे सहकार्य लाभले.
वनस्पतीचे काय आहे वैशिष्ट
फायकस लेकॉर असे शास्त्रीय नाव असलेल्या वनस्पतीला अंजीर सारखे केसाळ फळे येतात. या वनस्पती ची लांबी १० मीटरपर्यंत लांब असते. झाडाच्या फांद्याही केसाळ असतात. फांद्यांवर फळांचे गुच्छे असतात. वडाप्रमाणे यांना पारंब्या नसतात. पर्वत उतार व पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी या ही वनस्पती आढळून येते.
सातपुडा पर्वतरांग ही दुर्मीळ वनस्पतींचा खजिना आहे. काळानुरूप इथे नवनवीन दुर्मीळ वनस्पतींचा व प्राण्यांचा शोख लागत आहे. यामुळे जैवविविधतेचा बाबतीत सातपुडा पर्वताचे महत्व देशात वाढत जात आहे. अशा या अनमोल खजिन्याचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाबरोबर सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-डॉ.तन्वीर खान
(एच.जे.थीम, महाविद्यालय, जळगाव)