सातपुड्यात आढळली दुर्मिळ जाथारी किटकभक्षी वनस्पती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:31 PM2018-11-24T12:31:00+5:302018-11-24T12:31:43+5:30
जळगावच्या डॉ.तन्वीर खान यांना यश
अजय पाटील
जळगाव - खान्देशातील सातपुडा पर्वतरांग ही जैवविविधतेने नटलेली आहे. या पर्वतरांगेत आतापर्यंत अनेक दुर्मिळ वनस्पती आढळून आल्या आहेत. एच.जे.थीम महाविद्यालयातील प्राध्यापक, वनस्पती अभ्यासक डॉ.तन्वीर खान यांनी नुकतीच जाथारी नामक दुर्मिळ किटकभक्षी वनस्पती नंदुरबार जिल्ह्णातील तोरणमाळ तसेच डाब या भागात आढळून आली आहे.
जाथीरा ही अत्यंत दुर्मिळ किटकभक्षी वनस्पती आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘युट्रीक्युलाररीया जनार्थनामी’ असे आहे. डॉ.तन्वीर खान यांनी सांगितले की, भारतात या वनस्पतीच्या केवळ ३५ प्रजाती आहेत. त्या देखील आता नष्ट होण्याचा मार्गावर आहेत. ३५पैकी २२ प्रजाती या महाराष्टÑात आढळून येतात. कासच्या पठारावर सर्वाधिक नोंद होते. सातपुड्यात या वनस्पतीचा आतापर्यंत शोध घेण्यात आलेला नव्हता. पुणे विद्यापीठाचे डॉ.मिलिंद सरदेसाई यांनी या प्रजातीची सर्व प्रथम नोंद २००० मध्ये पश्चिम घाटात केली होती. डॉ.तन्वीर खान हे सातपुड्यात अभ्यासासाठी गेले असता त्यांना ही वनस्पती आढळून आली.
‘इंडियन फॉरेस्टर’ साठी शोध निबंध पाठविला
डॉ.खान यांनी डॉ. सरदेसाई यांच्याकडून या वनस्पतीची खात्री करून घेतली. त्यानंतर डॉ.खान यांनी या वनस्पतीवर तयार केलेला शोधनिबंध ‘इंडियन फॉरेस्टर’ या विज्ञान पत्रिकेला पाठविला आहे. यासाठी डॉ.विनोद कुमार गोसावी व अजहर शेख यांचे सहकार्य डॉ.खान यांना लाभले.
काय आहे, या वनस्पतीचे वैशिष्ट्य?
जाथीरा या वनस्पतीला आकर्षक निळे फुल असते. या वनस्पतीच्या तळाशी एक पिशवी असते. किटकांना त्यामध्ये भक्ष करून या वनस्पतीची वाढ होत असते. पर्वत उताराच्या पानथळ जागा तसेच पर्वतांवरील पाणी साचलेल्या जागेवर ही वनस्पती आढळून येते. डॉ.तन्वीर खान यांनी आतापर्यंत सातपुड्यातील अनेक दुर्मिळ वनस्पतींचा शोध घेतला आहे. तसेच नामशेष होत जाणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी ते अनेक वर्षांपासून काम करीत आहेत.
जाथीरा या वनस्पतीसह सातपुड्यातील इतर दुर्मिळ वनस्पतीच्या संवर्धनासाठी जंगलांवर प्रेम करणाºया नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. वनस्पतींचे अस्तित्व कायम राहण्यासाठी प्रशासनाकडून विशेष संवर्धन मोहीम राबविण्याची गरज आहे.
-डॉ.तन्वीर खान, वनस्पती अभ्यासक