भुसावळ येथे ‘स्वर तरंग’मध्ये रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 07:03 PM2018-10-05T19:03:59+5:302018-10-05T19:04:48+5:30
नाईक ट्रस्ट संचलित संगीत नृत्य कला निकेततर्फे ‘स्वर तरंग’ हा शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतावर आधारित गायन व वादनाचा बहारदार कार्यक्रम चांगलाच रंगला.
भुसावळ, जि.जळगाव : शहरातील प्रभाकर हॉलमध्ये नुकताच नाईक ट्रस्ट संचलित संगीत नृत्य कला निकेततर्फे ‘स्वर तरंग’ हा शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतावर आधारित गायन व वादनाचा बहारदार कार्यक्रम चांगलाच रंगला. यात भुसावळकर रसिक तल्लीन झाले होते.
मध्य प्रदेशातील नेपानगर पेपर मिल्सचे सेवानिवृत्त सहाय्यक व्यवस्थापक व रावेर तालुक्यातील विटवे येथील विजयकुमार रामचंद्र चौधरी यांच्या हस्ते उदघाटन झाले.
अध्यक्षस्थानी डॉ.नीलिमा नेहेते होत्या. प्रमुख म्हणून जळगावच्या मू.जे.महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुरेश तायडे, बासरी वादक आणि बीएसएनलचे उपमंडळ अभियंता सुनील वानखेडे होते.
संस्था संचालिका अनिता पाटील यांनी प्रास्तविक केले. संस्था अध्यक्ष डॉ. प्रदीप नाईक यांनी अमेरिकेहून पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाची ध्वनिफीत ऐकविण्यात आली. कला निकेतनमधून संगीत विशारद पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह देवून गौरविण्यात आले. संगीत नृत्य कला निकेतनच्या १०७ विद्यार्थ्यांनी स्वर तरंगमध्ये सहभाग घेतला. शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतावर आधारित गायन व वादनाच्या कार्यक्रमात प्रथम राग भीमपलासमध्ये सरगम गीत, बंदिश व स्वागतगीत सादर केल.
राग वृंदावानी सारंग, राग मुलतानी, पुरिया धनाश्री, राग यमनमध्ये सरगम व बंदिशी सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या तबला वादनाचा रसिकांनी आनंद घेतला. समारोपात ४० विद्यार्थ्यांनी एकाचवेळी (क्यसिओ) सिन्थेसाइजरवर राग भूपाली सदर करून प्रेक्षकांकडून दाद मिळविली. काव्य चौधरी व वेदांत फेगडे यांनी सिन्थेसाइजरवर साथ संगत तर तबल्यावर सिद्धेश माळी, रुद्र पाटील, अनिश कुलकर्णी व तेजस मराठे यांनी साथ सांगत केली.
संस्था सचिव सुरेश पाटील यांनी आभार मानले. संयोजन संचालिका अनिता पाटील यांनी केले होते. सुधा राशतवार, शारदा, सुनील माळी, देवेंद्र ठाकूर, सनी गुजराल, रवी लुल्ला यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.राजश्री देशमुख यांनी केले. स्वच्छ भारत अभियानांंतर्गत प्लॅस्टिक निर्मूलन मोहिमेत कापडी पिशवी वापरण्याची सवय लागावी या दृष्टीने गुर्जर महिला मंडळाच्या महिलांनी कापडी पिशवी वाटप केल्या.