भुसावळला नागरीप्रश्न रास्तारोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 09:54 PM2020-01-07T21:54:50+5:302020-01-07T21:54:55+5:30
तहसीलदार आंदोलनस्थळी आल्यावर मागे घेतले आंदोलन
भुसावळ : शहरातील रस्त्यांची कामे सात दिवसात पूर्ण करण्यात यावी, अमृत योजनेची चौकशी करून दोषींच्या संपत्तीवर बोजा टाकण्यात यावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील बेघरांना घरे देण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, जनाधार पार्टी व महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून यावल रस्त्यावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल ४३ मिनिटे हे आंदोलन सुरू होते. यादरम्यान या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
तहसीलदार दीपक धिवरे यांनी विविध १३ मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. माजी आमदार संतोष चौधरी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. जे रस्ते बनवले त्यात डांबर कमी व रॉकेल जास्त वापरल्यामुळे ते रस्तेही उखडले आहे. तर अमृत योजनेचे कामही उलट्या दिशेने सुरू करण्यात आले आहे. प्रथम पाईपलाईन टाकण्यात आली. त्यानंतर टाक्यांचे काम सुरू झाले. त्यानंतर पाण्याचा उद्भव शोधण्याचे काम सुरू करण्यात आले. खरे तर प्रथम पाण्याचा उद्भव शोधण्याची गरज होती. मात्र पाईपात मिळणाऱ्या कमिशनसाठी उलट्या दिशेने काम सुरू झाले असल्याचा आरोप माजी आमदार चौधरी यांनी आंदोलनस्थळी बोलताना केला आहे. तरी या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या संपत्तीवर बोजा टाकून पैसे वसूल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनामध्ये माजी आमदार चौधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष नितीन धांडे, माजी नगरसेवक ललित मराठे, भीमा कोळी, नगरसेवक शेख मुस्ताक शेख मुसा, सलीम पिंजारी, साजिद शेख, नगरसेवक जाकीर सरदार सिकंदर खान, अशोक चौधरी, माजी नगरसेवक आशिक खान शेर खान, युवराज पाटील, राष्ट्रवादीचे मुन्ना सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम, संजय खडसे, संतोष साळवे, विलास खरात, अॅड. प्रमोद चव्हाण , सूनील दांडगे, शैलेश अहिरे, वनिता खरारे, रेखा सोनवणे, राणी खरात, सिद्धार्थ सोनवणे, सलीम कुरेशी यांच्यासह शेकडो लोक सहभागी झाले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष नेमाडे, तालुकाध्यक्ष मराठे, ललित मराठे, गटनेते पगारे आदींनीही मनोगत व्यक्त केले.
अशा आहे इतर मागण्या
रेल्वे प्रशासनाने उत्तर भारतातील गरीब लोकांची घरे कोच फॅक्टरी बनवण्याच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्यात आली. मात्र या जागेवर कोणतीही कोच फॅक्टरी होत नसल्यामुळे याच जागेवर बेघर वासियांना हक्काची घरे बांधून देण्यात यावी व दुकानदारांना पुन्हा दुकाने बांधून देण्यात यावे., शहरात पंधरा ते वीस दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. ही पाणीटंचाई दूर करावी, डेंग्यूमुळे शहरातील अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना दहा लाख रुपये नगरपालिकेकडून मदत करण्यात यावी व आरोग्य विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, मुख्याधिकारी रजेवर असताना प्रभारी मुख्याधिकारी बबनराव तडवी यांच्या नियुक्ती दरम्यान पदाचा गैरवापर करून ठेकेदारांची दोन कोटी रुपयांचे बिले मंजूर करण्यात आली आहे. याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठेचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.