श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे मंगळवारी राष्ट्रमंदिर टॉक शो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 09:42 PM2021-01-07T21:42:31+5:302021-01-07T21:43:11+5:30
किशोर चौधरी यांची माहिती : १५ जानेवारीपासून निधी संकलन
जळगाव : जळगाव जिल्हा श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीतर्फे मंगळवार, १२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर अर्थात राष्ट्रमंदिर या संकल्पनेवर प्रकाश टाकणा-या राष्ट्रमंदिर टॉक शो चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे जिल्हा कार्यवाहक किशोर चौधरी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी क्षेत्रीय संघटन मंत्री श्रीरंग राजे, जिल्हा अभियान प्रमुख देवेंद्र भावसार, प्रतिमा याज्ञिक आदींची उपस्थिती होती.
हा टॉक शो सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात होणार असून या शोमध्ये श्री महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज (फैजपूर), भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी (मुंबई), डॉ.यशस्विनी तुपकरी (संभाजीनगर), जळगाव पीपल्स को.ऑप.बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील व डॉ. प्रसन्न पाटील आदींचा सहभाग असेल. या शोचे सूत्रसंचालन अॅड. सुशील अत्रे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१५ जानेवारीपासून निधी संकलन अभियान
अयोध्येत साकार होणा-या निधी समर्पण अभियानाची सुरूवात १५ जानेवारीपासून होणार आहे. एक महिना हे अभियान राबविण्यात येईल. जळगाव जिल्ह्यातही हे अभियान राबविणार असून घरोघरी जावून निधी संकलन केले जाणार आहे़ त्यामुळे वस्ती, गाव, शहर पातळीवर याचे नियोजन करण्यात आले आहे, असे भावसार यांनी सांगितले.
शनिवारी संत संमेलन
शनिवार, ९ जानेवारी रोजी पांझरापोळ संस्थान येथे संत संमेलन घेण्यात येणार आहे. त्यानंतर १० रोजी शहरातील विविध वस्तीत महिलांनी रामायणातील प्रसंगावर आधारित रांगोळी काढण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शिवतीर्थ मैदानपासून तरूणांची मोटारसायकल रॅली काढण्यात येवून त्या रॅलीचे आकाशवाणी चौकात समारोप केला जाणार आहे.