पेन्शनधारकांचा ‘रास्तारोको’; मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 05:32 PM2023-03-15T17:32:45+5:302023-03-15T17:34:38+5:30
वाहतूक विस्कळीत झाल्यावर पोलिसांनी धावाधाव करुन आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत मागण्यांविषयी चर्चा केली.
कुंदन पाटील -
जळगाव : किमान पेन्शन आणि महागाई भत्त्यासाठी ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्यावतीने बुधवारी आकाशवाणी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. पंधरा मिनिटांच्या या आंदोलनात जिल्ह्यातील दीड हजारावर पेन्शनर सहभागी झाले. वाहतूक विस्कळीत झाल्यावर पोलिसांनी धावाधाव करुन आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत मागण्यांविषयी चर्चा केली.
सकाळी १० वाजता या समितीची बैठक झाली. बैठकीत साडे सात हजारांचे न्यूनतम पेन्शनसह महागाई भत्ता मिळावा, तसेच दि.१ ऑक्टोबर २०१४ पूर्वीच्या आणि त्यानंतरच्या पेन्शनधारकांना सेवा, सुविधा, योजना पुरविताना भेदभाव करु नये, मोफत वैद्यकीय सेवा पुरवावी, अशा मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकाळी ११ वाजता आकाशवाणी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सर्वच आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर झोपून वाहतूक रोखून धरली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आणि पाच सदस्यीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची भेट घेतली. मागण्यांविषयी चर्चा केली. त्यानंतर निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष अरविंद भारंबे, यु.डी.चौधरी, बी.एन.पाटील, संजीव खडसे, कौतिक किरंगे, रमेश नेमाडे यांनी केले.