शिधापत्रिकेवरून राज्यात कोठूनही घेता येईल धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:52 PM2018-11-15T12:52:17+5:302018-11-15T12:52:55+5:30
जळगाव जिल्हा केरोसीनमुक्त
जळगाव : सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये जिल्ह्यात मोठी सुधारणा झाली असून आता ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टीम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून कोठूनही धान्य घेता येणार आहे. याची अंमलबजावणी डिसेंबर अखेरपासून होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. दरम्यान, संपूर्ण जळगाव जिल्हा केरोसीनमुक्त झाला असून राज्यातील जळगाव जिल्हा हा पहिलाच केरोसीनमुक्त जिल्हा ठरला असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संगणकीकरण माहिमेमुळे जिल्ह्यातील धान्य वितरणात आलेल्या पारदर्शकतेविषयी माहिती देण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी जाधव यांनी ही माहिती दिली.
नोव्हेंबर महिन्यात एक थेंबही केरोसीनची मागणी नाही
जळगाव जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून केरोसीनची मागणी कमी करण्यावर भर देण्यात आला. तेव्हापासून ही मागणी कमी कमी होत गेली. जुलै महिन्यात जिल्ह्यासाठी ८ लाख ५० हजार लीटर केरोसीनची मागणी होती. ती नोव्हेंबर महिन्यात शून्यावर आली आहे. त्यामुळे राज्यातील एकमेव जळगाव जिल्हा पूर्णपणे केरोसीनमुक्त झाला असून पुणे व सोलापूर हे केवळ शहर केरोसीनमुक्त झाले आहेत. तेथील ग्रामीण भागात मात्र अद्यापही केरोसीनचा पुरवठा आहेच. खान्देशातील धुळे जिल्ह्यात अजूनही दरमहा एक लाख २० हजार लीटर तर नंदुरबार जिल्ह्यात सहा लाख लीटर केरोसीनची मागणी असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
८१ टक्के धान्य वितरण ई-पॉसद्वारे
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांवरून होणारे ८१ टक्के धान्य वितरण ई-पॉसद्वारे होऊ लागले असून यातून धान्याचीही बचत होत असल्याचे जाधव यांनी सांगितले. ई-पॉसच्या अंमलबजावणीपूर्वी जिल्ह्यासाठी लागणाऱ्या तब्बल २१ हजार मेट्रीक टन धान्यांची वेळेत उचल होऊ शकत नव्हती, त्यामुळे ते रद्द झाले होते. मात्र आॅनलाईन प्रणालीमुळे वितरणात गती येऊन व मागणीबाबतही वेळेत कामे होऊ लागल्याने आवश्यक तेवढ्या धान्याची उचल होत असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर खºया लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहचू लागल्याने मे महिन्यापासून आतापर्यंत ५० हजार ८०१ क्विंटल धान्याची बचत झाली आहे.
या प्रणालीमुळे बचत होणारे धान्य नवीन गरजूंची नोंद करून त्यांना वितरीत करण्यात येणार असल्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी या वेळी सांगितले.
पावती न देणाºया स्वस्त धान्य दुकानावर गुन्हे दाखल होणार
ई-पॉसद्वारे धान्य वितरण होत असताना स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकेधारकास पावती देणे आवश्यक आहे. दुकानदाराने पावती दिली नाही तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेशच असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे ग्राहकांनीही पावती घ्यावी व आपण घेतलेल्या धान्याचीच नोंद त्यावर आहे की नाही याची खात्री करावी, असे आवाहनही जाधव यांनी केले आहे.
स्वस्त धान्यातही ‘पोर्टेबिलीटी’
स्वस्त धान्य दुकानांवरही आता ‘पोर्टेबिलीटी’ येणार आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टीम’ या प्रणालीद्वारे आता शिधापत्रिकाधारक राज्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानावरून धान्य घेऊ शकणार आहे. या प्रणालीचे बहुतांश काम झालेले असून डिसेंबर अखेरपासून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा असल्याचे या राहुल जाधव यांनी सांगितले.
गॅस वितरणाबाबत वेळापत्रक
ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याच्या प्रश्नावर जाधव यांनी सांगितले की, गॅस वितरकांची बैठक घेतली असून त्यांना ग्रामीण भागात गॅस वितरणाविषयी वेळापत्रकच तयार करण्यास सांगितले असून ठरवून दिलेल्या दिवशी त्या-त्या गावात गॅस वितरणाच्या सूचना दिल्या आहेत. शहरी भागातही तुटवड्यामुळे विलंब होत असल्यास कंपन्यांना सूचना दिल्या असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
दिवाळीमध्ये धान्यास विलंब
दिवाळी सणामध्ये अनेक ठिकाणी गरजूंना धान्य वेळेत मिळाले नसल्याच्या प्रश्नावर बोलताना जाधव म्हणाले की, दिवाळी सण महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आला. त्याचवेळी चलण भरणे व इतर प्रक्रिया यामुळे एक-दोन दिवस धान्य मिळण्यास अडचणी आल्या. तालुकास्तरावरून हे धान्य पोहचविणे सुरूच होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठळक मुद्दे
- स्वस्त धान्य दुकानावरून मिळणार ५ किलोचे गॅस सिलिंडर, बी-बियाणे, मिनी बँक सेवा, ई-सेवा केंद्राची सुविधा.
- तक्रारींमुळे जिल्ह्यातील २०० स्वस्त धान्य दुकानांचे परवाना रद्द.
- केरोसीनमुक्तीमुळे अनुदानाच्या रकमेत चार कोटींची बचत
- चुकीची नोंदी असलेल्या २३ हजार शिधापत्रिका दीड महिन्यात केल्या रद्द.
तालुकानिहाय ई-पॉसद्वारे धान्य वितरणाची टक्केवारी
तालुका टक्केवारी
रावेर ८८.३०
चाळीसगाव ८८.१८
भडगाव ८७.८४
पारोळा ८६.६१
चोपडा ८६.२४
एरंडोल ८५.८७
धरणगाव ८३.८५
पाचोरा ८३.१५
अमळनेर ८२.४८
जामनेर ८२.०७
मुक्ताईनगर ७९.६२
यावल ७८.८०
बोदवड ७५.१५
जळगाव ५७.६४
भुसावळ ५७.३८