प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेशन माफिया मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:55 PM2019-09-07T12:55:03+5:302019-09-07T12:55:19+5:30

तालुकास्तरावर दिलेली फिर्याद कमकुवत

Ration Mafia Mokat due to neglect of administration | प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेशन माफिया मोकाट

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेशन माफिया मोकाट

Next

जळगाव : रावेर मधील तीन गोडावूनवर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांसह छापा टाकून ११८ क्विंटल धान्यसाठा जप्त केल्याप्रकरणात जिल्हा प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे तालुकास्तरावरच याबाबत तक्रार नोंदविण्याची व तपासाची कारवाई सुरू झाली. त्यामुळे रेशन माफियांविरोधात शासनाकडून प्रभावीपणे बाजूच मांडली न गेल्याने त्यांची लगेचच जामीनावर सुटका झाल्याने या माफियांना जीवदानच मिळाले आहे. रेशनचे धान्य परराज्यात काळ्याबाजारात विकणारे रॅकट उध्वस्त करण्याची संधी त्यामुळे प्रशासनाने गमावली आहे.
गोडावूनवर छापे टाकून धान्यसाठा जप्त करण्यात आला होता. त्यात पहिल्या गोडावूनमध्ये गहू, तांदूळ व साखरेचा साठा आढळून आला होता. तर गोडावून क्र.२ मध्ये गहू व हरभरा तर तिसºया गोडावूनमध्ये मका साठवला असल्याचे आढळून आले होते.
फिर्याद तालुकास्तरीय अधिकाºयाकडून
महिनाभरापासून या रेशनमाफियांवर लक्ष ठेवून छाप्याची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांच्यावर कारवाई करीत आहोत, ते सर्व परराज्यात रेशनची विक्री करणाºया साखळीचा भाग असल्याचे माहिती होते. जर तालुकास्तरावर कारवाई झाली असती तर वर्षानुवर्ष हा रेशनचा काळाबाजार सुरूच राहू शकला नसता. मात्र तरीही पोलिसांत फिर्याद देण्याची जबाबदारी तालुकास्तरावर सोपवून वरिष्ठ मोकळे झाले. त्यामुळेच आरोपींना जामीन मिळविणे सोपे गेल्याची चर्चा आहे.
जिल्हाधिकाºयांकडून तपासणीचे आदेश
या कारवाईनंतर जिल्हाधिकाºयांनी सर्व रेशन दुकानांच्या तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार यावल व रावेर तालुक्यातील सर्व रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात रावेर तालुक्यातील १६ दुकानांचे परवाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने रद्द करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घातले तरच मूळ दोषींवर कठोर कारवाई शक्य आहे.
कागदावर एक अन ओठांवर एक
या प्रकरणातील संशयित आरोपी विलास चौधरी, बाळकृष्ण नेवे व विलास पाटील यांना जिवनावश्यक वस्तू कायदा कलम ६-ब खाली नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार त्यांनी ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून लेखी म्हणणे सादर केले. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी तसेच जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्यासमोर संशयितांनी कान धरून माफीही मागितली. मात्र खुलाश्यामध्ये मात्र त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे कागदावर एक आणि ओठांवर एक असेच चित्र आहे. आता ९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
साखर आली कुठून?
पहिल्या गोडावूनमध्ये गहू, तांदूळ व साखर आढळून आले. मात्र नेवे व चौधरी यांनी ते गोडावून त्यांचे नसल्याचे सांगितले. तर विलास पाटील यांनी जागा भाड्याने घेऊन त्यावर हे गोडावून बांधले असल्याचे सांगत गहू व तांदूळ त्यांचा आहे. मात्र साखर त्यांची नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे साखर आली कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Ration Mafia Mokat due to neglect of administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव