रेशन दुकानदारांचा संप मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:16 AM2021-05-12T04:16:54+5:302021-05-12T04:16:54+5:30
जळगाव : ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशनच्या रेशन दुकानदार संघटनेने १ मे पासून बेमुदत संप पुकारला होता. ...
जळगाव : ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशनच्या रेशन दुकानदार संघटनेने १ मे पासून बेमुदत संप पुकारला होता. त्यातील प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आल्याने १२ मे पासून जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या संघटनेने संप मागे घेतला आहे. बुधवारपासून सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरू करण्यात आली आहेत.
शासनाने स्वस्त धान्य दुकानदार यांना ५० लाखांचे विमा सुरक्षाकवच द्यावे, तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा द्यावा, लाभार्थ्यांना बायोमेट्रिकची सक्ती करू नये, कमिशन वाढवून द्यावे, अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. शासनाने दुकानदारांचे आधार प्रमाणित करून अन्नधान्य वाटपाची मुभा दिली आहे. त्यासोबतच इतर मागण्यांसाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विलास पाटील आणि ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.
बुधवारपासून ही दुकाने नियमित वेळेत सुरू करण्यात येतील, अशी माहिती रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी दिली.