धान्य शिल्लक असतानाही जळगाव शहरातील रेशन दुकाने राहताहेत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:37 PM2017-10-22T22:37:14+5:302017-10-22T22:40:33+5:30
ऐन दिवाळीत ग्राहकांची गैरसोय : ५० टक्के कार्डधारकांचे धान्य घेणे बाकी
आॅनलाईन लोकमत,
जळगाव, दि.२२- रेशन दुकानांमध्ये धान्य शिल्लक असताना ते उघडेच ठेवले पाहिजेत, असा नियम असतानाही ठरवून दिलेल्या तारखेव्यतिरिक्तही शहरातील बहुतांश रेशन दुकाने रविवार, २२ रोजी बंद असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. याबाबत माहिती घेऊन संबंधीतांना ताकीद देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली. ऐन दिवाळीच्या काळात दुकाने बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.
५० टक्के कार्डधारकांनीच नेलाय माल
जिल्ह्याला १६.१२५ मेट्रीक टन म्हणजेच ९ लाख ६० हजार क्विंटल धान्य दरमहा मिळते. आॅक्टोबर महिन्यासाठीदेखील तेवढेच धान्य मिळाले होते. एकूण ६ लाख कार्डधारक आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख कार्डधारकांनी रेशन दुकानांवरून धान्य नेले आहे. म्हणजेच अद्यापही ५० टक्के लोकांनी धान्य नेलेले नाही. म्हणजेच ते धान्य रेशन दुकानांमध्ये शिल्लक आहे. असे असल्याने सर्व रेशन दुकाने सुरू असणे आवश्यक होते. मात्र रविवारी दुपारी ४ ते ६ या वेळात केलेल्या पाहणीत अनेक रेशनदुकाने बंद असल्याचे आढळून आले. दीक्षीतवाडी, गणेशवाडी, शिवाजीनगर, हरेश्वरनगर आदी भागातील रेशन दुकाने बंद असल्याचे आढळून आले. तर रामानंदनगरातील रेशनधान्य दुकान सुरू असल्याचे आढळून आले.
केसरी कार्डधारकांसाठी धान्यच मिळेना
याबाबत रेशनदुकानदाराकडे विचारणा केली असता केवळ प्राधान्य कुटुंबासाठीचेच धान्य मिळत असून केसरी कार्डधारकांसाठीचे धान्य मिळत नसल्याचे तसेच साखर तर गेल्या अनेक महिन्यांपासूनच मिळणे बंद झाल्याचे सांगितले. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना विचारणा केली असता केसरीकार्ड धारकांना धान्य मिळत नाही, असे म्हणणे चुकीचे असून बीपीएल कार्डधारक तसेच ४४ हजारांच्या आत उत्पन्न असलेल्या ७६.२५ टक्के लोकांना धान्य मिळत आहे. केवळ उर्वरीत २४ टक्के लोकांना (नॉन प्रायॉरिटी हाऊसहोल्डस किंवा अप्राधान्य कुटुंब) धान्य मिळत नसल्याचे सांगितले.
-----
रेशन दुकानात दिलेल्या नियतनाचे धान्य शिल्लक असेपर्यंत ठरवून दिलेल्या दिवसाखेरीज अन्य सर्व दिवस दुकान सुरू ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे जर ही रेशन दुकाने बंद असतील तर त्याची माहिती घेऊन संबंधीताना ताकीद दिली जाईल.
- राहुल जाधव,जिल्हा पुरवठा अधिकारी