रावेरमध्ये कोरोना बाधितांच्या संपर्कातील साखळी लांबतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 04:45 PM2020-06-23T16:45:16+5:302020-06-23T16:46:09+5:30
कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील साखळी लांबत चालल्याने कोरोना बाधितांची संख्या १८४ वर पोहोचली आहे.
रावेर : तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील खानापूर येथील पीक संरक्षण सहकारी संस्था परिसरातील ६० वर्षीय आत्या व २० वर्षीय भाचा, सावदा शहरातील ५४ वर्षीय पुरूष तर भोकरी येथील ३० वर्षीय महिला अशा चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील साखळी लांबत चालल्याने कोरोना बाधितांची संख्या १८४ वर पोहोचली आहे.
दरम्यान, रावेर व यावल तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी न्हावी येथील जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत १०३ रूग्णांना कोरोनामुक्त करून सुटका करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिली. या यशाचे श्रेय त्यांनी रुग्णवाहिका चालक, डॉक्टर, अधिपरिचारिका, औषधनिर्माते, शिपाई, सफाई कामगार व सर्व यंत्रणेला दिले आहे.
दरम्यान, सदर कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांनी समयसूचकता बाळगून अत्यावश्यक त्यासंदर्भसेवेसाठी भुसावळ व जळगाव येथील रुग्णालयात वेळीच स्थलांतरित केल्याने त्यांचेही प्राण वाचवण्यात यश आल्याची पुष्टी त्यांनी जोडली आहे.