रावेर न्यायालयाने अंजली दमानियांचा गैरहजेरीचा अर्ज मानवतेच्या दृष्टीने केला मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 08:59 PM2018-03-07T20:59:41+5:302018-03-07T20:59:41+5:30
सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल खटल्यात रावेर न्यायालयाने बजावलेले अटक वॉरंटचे आदेश त्या कर्करोगाने रुग्णालयात औषधोपचार घेत असल्याचे व त्यांना प्रवासात जंतुसंसर्ग होऊन जिवास धोका असल्याचे कारणाने ९ फेब्रुवारीच्या सुनावणीत माघारी घेतले होते.
रावेर : सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल खटल्यात रावेर न्यायालयाने बजावलेले अटक वॉरंटचे आदेश त्या कर्करोगाने रुग्णालयात औषधोपचार घेत असल्याचे व त्यांना प्रवासात जंतुसंसर्ग होऊन जिवास धोका असल्याचे कारणाने ९ फेब्रुवारीच्या सुनावणीत माघारी घेतले होते.
मात्र आजच्या सुनावणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या त्यांची सुकन्या जान्हवी व वरुण यांच्या मंगलविवाहाच्या आज मुंबईत आयोजित केलेल्या स्वागत समारंभामुळे व कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. मंदार नाडकर्णी यांनी त्यांच्यावरील दोन कर्करोगाच्या झालेल्या मोठ्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना केमोथेरपी तथा नियमित ड्रेसिंग करावे लागत असल्याने ४५० ते ५०० किमी अंतराचा प्रवास करणे त्यांच्या जीवितास घातक असल्याचा वैद्यकीय दाखला दिला असल्याने मानवतेच्या दृष्टीने त्यांची आजची अनुपस्थिती मंजूर करावी, अशी विनंती त्यांचे वकील अॅड. सुधीर कुलकर्णी यांनी न्यायालयाला केली. त्या अनुषंगाने रावेर न्यायालयाचे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश दिलीप मालवीय यांनी मानवतेच्या दृष्टीने त्यांची अनुपस्थिती मंजूर करीत असून, पुढील १३ एप्रिलच्या सुनावणीसाठी आरोपी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना हजर ठेवण्याचे आदेश दिलेत.
सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना त्या समन्स बजावल्यानंतर एकदाही हजर न झाल्याने ८ फेब्रुवारी रोजी रावेर न्यायालयाने अटक वॉरंट बजावण्याचे आदेश पारीत केले होते. मात्र, त्यांच्यातर्फे जळगावहून अॅड. सुधीर कुलकर्णी व अॅड. दिलीप बोरसे यांनी त्यांच्यावर मुंबईच्या कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसातील व स्तनातील कर्करोगाची मोठी शस्त्रक्रिया झाली असल्याने व त्यांना लांब अंतराच्या प्रवासात जंतूसंसर्ग होऊन जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर रावेर न्यायालयाने अटक वॉरंटचे बजावलेले आदेश माघारी घेत असल्याचे पुनर्आदेश पारीत केले होते.
मात्र आजच्या सुनावणीसाठी त्या पुन्हा अनुपस्थित राहिल्याने फिर्यादी भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी त्या अनुपस्थित असल्याने त्यांना अटक वॉरंट बजावण्यात यावेत, असा विनंतीअर्ज त्यांचे वकील अॅड. चंद्रजित पाटील व अॅड. तुषार माळी यांनी दिला. तर आरोपी अंजली दमानिया यांच्यातर्फे त्यांच्या सुकन्या जान्हवी व वरुण यांच्या शुभमंगल विवाहाचा मुंबईत आज पूर्वनियोजित स्वागत समारंभ असल्याने जन्मदात्री म्हणून त्यांना हजर राहणे नितांत गरजेचे आहे. तसेच कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. मंदार नाडकर्णी यांनी त्यांच्यावरील दोन कर्करोगाच्या झालेल्या मोठ्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना केमोथेरपी तथा नियमित ड्रेसिंगचे औषधोपचार सुरू असल्याने ४५० ते ५०० किमी अंतराचा प्रवास करणे जंतुसंसर्गाचे शक्यतेमुळे जीवास घातक ठरणार असल्याने त्यांची अनुपस्थिती मंजूर करून दोन ते तीन महिन्यांनंतरची तारीख द्यावी, अशी न्यायालयासमोर विनंती केली होती.
त्यावर फिर्यादीपक्षाचे म्हणणे मागवले असता अॅड. चंद्रजित पाटील यांनी आरोपीच्या अर्जावरच मुळात कुणाची स्वाक्षरी नसल्याने व आरोपी समन्स बजावल्यानंतर एकदाही स्वतः प्रत्यक्ष न्यायालयात हजर झाला नसल्याने त्यांची अनुपस्थिती मंजूर करू नये असा औचित्याचा मुद्दा अॅड. चंद्रजित पाटील यांनी उपस्थित केला. त्या अनुषंगाने न्यायालयाने आरोपी पक्षाचा अर्ज रद्द करून नवीन अर्ज सादर करण्याचे आदेश दिले.
आरोपी अंजली दमानिया यांच्या वकिलांनी फेरअर्ज सादर केल्यानंतर न्यायालयाने पुन्हा फिर्यादी पक्षाची बाजू ऐकून घेतली. त्यात फिर्यादी पक्षाचे अॅड. चंद्रजित पाटील यांनी पुन्हा आरोपी या मुलीच्या लग्नासाठी स्वागत समारंभात उपस्थित राहू शकत असतील तर त्या न्यायालयात का म्हणून उपस्थित राहू शकत नाहीत? असा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून रावेर न्यायालयाचे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश दिलीप मालवीय यांनी मानवतेच्या दृष्टीने अंजली दमानिया यांची अनुपस्थिती मंजूर करीत असून, १३ एप्रिल रोजीच्या पुढील सुनावणीसाठी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश पारीत केलेत.