रावेर येथे श्री ओंकारेश्वर भोकरी देवस्थानावर उसळणार गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 03:20 PM2019-08-18T15:20:55+5:302019-08-18T15:22:44+5:30
भोकर नदीच्या काठी भोकरी शिवारातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथील श्री ओंकनाथ महादेवांचे कपीला गायीच्या कपीलधारांखाली स्वयंभू प्रकटलेले शिवलिंग असून, ऋषी श्री अगस्ती मुनींनीचं या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याची व खांडववनात वनवासात असताना श्रीप्रभुरामचंद्र सीता व लक्ष्मणाने महारूद्राभिषेक केल्याची आख्यायिका आहे.
किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील भोकर नदीच्या काठी भोकरी शिवारातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथील श्री ओंकनाथ महादेवांचे कपीला गायीच्या कपीलधारांखाली स्वयंभू प्रकटलेले शिवलिंग असून, ऋषी श्री अगस्ती मुनींनीचं या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याची व खांडववनात वनवासात असताना श्रीप्रभुरामचंद्र सीता व लक्ष्मणाने महारूद्राभिषेक केल्याची आख्यायिका आहे. भाविकांचे सकल मनोरथ सिध्दीस जाणारे जागृत देवस्थान असून श्रावण मासातील सोमवारी शिवभक्तांची मोठी गर्दी उसळते.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी श्री ओंकारेश्वर मांधाता (मध्य प्रदेश) व तालुक्यातील भोकरी शिवारातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर देवस्थानच्या साधर्म्याबाबत आख्यायिका सांगितली जाते. भगवान सूर्यनारायणांना नर्मदा परिक्रमा करताना श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे मेरू तथा विंध्यांचल पर्वतरूपी असूराने अडथळा निर्माण केला. परिणामी सर्वत्र अंध:काराचा काळोख पसरला. त्यामुळे देवगणात मोठी खळबळ उडाली. ही घटना कळताच महर्षी अगस्ती मुनींनी श्री क्षेत्र ओंकारेश्वर मांधाता (म.प्र.) ला जाण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी खांडव वनातील भोकर नदी तीरावरून जात असताना त्यांना एक पांढरी शुभ्र कपीला गायीच्या स्तनांमधून आपोआप कपीलधारा निघून दुग्धाभिषेक होत असल्याचा दृष्टांत घडला.
त्या उत्कंठेने महर्षी अगस्ती मुनींनी त्या गायीकडे धाव घेतली. जवळ जाताच त्यांना दुधाच्या त्या कपीलधारांमुळे पडलेल्या खड्ड्यात श्री ओंकनाथ महादेवाचे शिवलिंग प्रकटल्याचे दर्शन घडले. श्री ओंकारेश्वर मांधाता येथे जातानाच पायवाटेत महादेवाचे दर्शन घडल्याने महादेवाच्या शिवलिंगाची ‘ओंकनाथ’ महादेव म्हणून त्यांनी प्रतिष्ठापना केली. दरम्यान, पुढे थेट ओंकारेश्वर मांधाता येथे प्रस्थान करीत त्यांनी मेरू तथा विंध्यांचल पर्वतावर धडक दिली. महर्षी अगस्ती मुनींना पाहताच त्यांचा शिष्य असलेल्या मेरू असूराने ‘गुरूजी पाय लागू’ म्हणत त्यांच्या चरणांवर दंडवत घालून शरण गेला. गुरूजी आज्ञा असो असे म्हणताच त्यांनी मी परत येईपर्यंत असाच दंडवत घालून उभा रहा... अशी अगस्ती मुनींनी परमाज्ञा दिल्याने भगवान सुर्यनारायणांना नर्मदा परिक्रमेचा मार्ग मोकळा झाल्याची आख्यायिका सांगितली जाते.
तद्नंतर, श्री प्रभुरामचंद्र सीता व लक्ष्मणासह वनवासात मार्गक्रमण करीत असताना खांडव वनात आले. तेव्हा त्यांनी या जागृत श्री ओंकनाथ महादेवाच्या शिवलिंगावर महारूद्राभिषेक केल्याची आख्यायिका सांगितली जात असून, त्यांनी याठिकाणी तीन दिवस मुक्कामाचे वास्तव्य केल्याचे म्हटले जाते. आजही येथे सीतेची न्हाणी तत्संबंधी साक्ष देवून जाते.
श्री ओंकनाथ महादेव मंदिर हे पुरातन हेमाडपंथी असून राणी अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराला तटबंदी करून जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. स्वयंभू ओंकनाथ महादेवाचे जागृत शिवलिंग, तपोव्रतातील गंगामैय्या, उजव्या सोंडेंचे स्वयंभू सिध्दीविनायक गणेश, कार्तिकस्वामी महाराज, श्रीराम मंदिर, श्री विठ्ठल रूख्मिणी मंदिर, श्री दत्त मंदिर व भैरवनाथ यांचे मंदिर या मंदिरात आहे. दक्षिणेला भोकर नदीच्या तीरावर स्मशानभूमी असल्याने या मंदिरात शिवजींचा परिवार असलेले हे एकमेव मंदिर असल्याची अनन्यसाधारण भावना भाविकांच्या मनात आहे.
अशा या लाखो भाविकांची श्रध्दा असलेल्या श्री ओंकारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र, श्रावण मासातील सोमवार, ऋषीपंचमी व आषाढी तथा कार्तिकी एकादशी, कार्तिक पौर्णिमा आदी महोत्सव साजरे केले जातात. सोमवारी सकाळी श्री ओंकारेश्वर देवस्थान येथे केºहाळा बुद्रूक येथील एका शिवभक्तांतर्फे पुरोहित जयवंत महाराज यांच्या हस्ते महारूद्राभिषेक करून महापूजा तथा महाप्रसादाचा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष अशोक पाटील, सचिव मुरलीधर चौधरी, खजिनदार श्रीराम अग्रवाल, विश्वस्त गोपाळ चौधरी, सतीश पाटील, रामेश्वर अग्रवाल, रमेश पाटील आदी विश्वस्त मंडळ परिश्रम घेत आहेत.
दरम्यान, श्री क्षेत्र सुलवाडी येथील महंत १००८ एकनाथदास महाराज यांच्या कुटीपासून ते श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे २५ आॅगस्ट रोजी कावडयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे