रावेरला कारमधील गॅस गळतीमुळे ‘बर्निंग कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:11 PM2019-04-12T23:11:26+5:302019-04-12T23:13:02+5:30
रावेर शहरातील कैलास दयालदास वाणी यांच्या मुलाच्या उभ्या असलेल्या कारने शुक्रवारी रात्री ७.४० वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामुळे ही ‘बर्निंग कार’ पालिकेचा अग्निशमन बंब पोहोचण्यापूर्वीच आगीत भस्मसात झाली.
रावेर, जि.जळगाव : शहरातील डॉ.पी.टी. पाटील यांच्या हॉस्पिटलच्या पाठीमागील कैलास दयालदास वाणी यांच्या मुलाच्या उभ्या असलेल्या कारने शुक्रवारी रात्री ७.४० वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामुळे ही ‘बर्निंग कार’ पालिकेचा अग्निशमन बंब पोहोचण्यापूर्वीच आगीत भस्मसात झाली. आजच्या अतिउष्ण तापमानामुळे सदर कारमधील गॅसकिटमधून ज्वलनशील गॅसची हळूहळू गळती होऊन अकस्मात आगीने भडका घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले.
सदर कारने पेट घेताच आगीचा धोका दर्शवण्यासाठी कारमधील सायर वाजल्याने घराघरातून अनेकांनी मदतीचा हात देण्यासाठी धाव घेतली. काही क्षणात अग्निशमन दलाचा बंब पोहोचण्यापूर्वीच सदरची बर्निंग कार आगीत भस्मसात झाली.
तत्पूर्वी सदर आग विझवताना कैलास वाणी यांचा मुलगा व नातूस गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. रावेर अग्निशामक दलाचे धोंडू वाणी, विजय महाजन, दीपक महाजन आदींनी आग नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम घेतले. यासंदर्भात रावेर पोलिसात कोणतीही नोंद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.