रावेर लोकसभा : ‘कहो दिलसे रक्षा खडसे फिरसे’ ही साद मतदारांना भावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:51 AM2019-05-28T11:51:14+5:302019-05-28T11:52:18+5:30
भुसावळ वगळता सर्वच मतदार संघात लाखावर मते
विलास बारी
जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघात भाजपाचे बुथनिहाय नियोजन आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा शेवटपर्यंत उमेदवार निश्चित करण्यासाठी चाललेला घोळ ही परिस्थिती पाहता भाजपचा विजय निश्चित मानला जात होता.
राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे व्यक्तीमत्व असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राजकीय विजनवासात आहेत.
मात्र त्यांची आजही जिल्ह्यातील राजकारणावर मजबूत पकड असल्याचे या निकालाने सिद्ध झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या गैरहजेरीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराचे नियोजन व बुथरचनेची चांगल्याप्रकारे तयारी करीत एकहाती विजयश्री खेचून आणली.
दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात जागा कुणाला सोडावी यावरून एकमत होत नसल्याने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार निश्चित होत नव्हता.
राष्ट्रवादीला अपेक्षित उमेदवार न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसला ही जागा सोडली. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांना मतदार संघात प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला नाही. भुसावळात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून लांब राहिले. अन्य शहरांमध्ये फारशी वेगळी परिस्थिती राहिली नाही.
रावेर व यावल तालुका वगळता अन्य ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्वच नसल्याने भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना एकहाती विजय मिळविता आला.
लोकसभा निवडणुक घोषित झाली तेव्हाच विजय निश्चित होता. फक्त लिड कितीचा मिळतो याबाबत उत्सुकता होती, आणि हे सार्थ ठरले.
विधानसभेचे गणित कसे राहील...?
लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठी शिवसेना व भाजपची युती कायम राहिल्यास रावेर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात शिवसेना व भाजपसाठी पोषक वातावरण राहणार आहे. युती झाल्यास मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना शिवसेनेचा फारसा विरोध राहणार नाही. तर भुसावळातील जागेवर शिवसेनेने आपला हक्क सांगितल्यास मात्र विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यासाठी अडचणीची बाब ठरणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनादेखील विधानसभेसाठी आतापासून तयारी करावी लागणार आहे.
विजयी उमेदवारांसमोरील आव्हाने काय?
केळी या पिकांवर वारंवार पडणारा रोग व नुकसानीसाठी केंद्र शासनाकडून भरीव उपाययोजना करावी लागणार
मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून तो पूर्णत्वास आणावा लागणार आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रावेर लोकसभा मतदार संघात गंभीर आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार आहे.