रावेरला स्वतंत्र कोवीड सेंटर सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 03:44 PM2020-04-13T15:44:11+5:302020-04-13T15:45:41+5:30
वसतीगृहाची वास्तू अधिग्रहित : १५ खाटांची केली तातडीने व्यवस्था
रावेर : कोरोना विषाणुचा संसर्ग तिसऱ्या टप्प्याकडे जात असतांना शासनाने युध्दपातळीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून धडक पाऊले उचलली आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात कोव्हीड केअर सेंटर उभारण्याच्या पार्श्वभूमीवर रावेर येथील सावदा रोडलगतच्या तडवी कॉलनी लगत नव्याने उभारण्यात आलेल्या समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाची नवीन वास्तू शासनाने अधिग्रहित केली आहे. २८ खोल्या असलेल्या या दुमजली इमारतीत ९० खाटांचे स्वतंत्र कोरोना रुग्णालयात रविवारी १५ खाटांची तातडीची व्यवस्था न .पा. मुख्याधिकारी रविंद्र लांडे व रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ एन डी महाजन यांनी केली आहे.
दुमजाली इमारतीत
आहे २८ खोल्या
शहरातील रावेर - सावदा राज्य महामार्गाच्या लगत असलेल्या तडवी कॉलनीच्या पाठीमागे असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाच्या उद्घाटनाची फितही न कापलेली ही नवी वास्तू आहे.
या दुमजली इमारतीत २८ रूम असून ९० खाटांचे हे कोव्हीड केअर सेंटर असलेल्या स्वतंत्र कोरोना रूग्णालयाला मंजूरी मिळाली आहे. लवकरच पूर्ण खाटांचे नियोजन होणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक साधनसामुग्री, वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामुग्री, वैैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारीका, औषधनिर्माण अधिकारी व आरोग्य कर्मचारींचे संख्याबळ यासंबंधी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून अहवाल मागवण्यात आला आहे.