रावेर तालुक्यात खानापूर मंडळाखेरीज ६ मंडळात मे हिटच्या ४५ सेल्सिअंश पेक्षा जास्त तापमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 04:03 PM2020-06-05T16:03:27+5:302020-06-05T16:04:39+5:30
तालुक्यात मे हिटच्या तडाख्यात सूर्याने आग ओकल्याने किमान ४५.०१ ते कमाल ४८. ०१ तापमानाची नोंद तालुक्यातील महावेधच्या हवामानमापक यंत्रावर झाली आहे.
किरण चौधरी
रावेर : तालुक्यात मे हिटच्या तडाख्यात सूर्याने आग ओकल्याने किमान ४५.०१ ते कमाल ४८. ०१ तापमानाची नोंद तालुक्यातील महावेधच्या हवामानमापक यंत्रावर झाली आहे. खानापूरसह ऐनपूर, खिर्डी, निंभोरा, सावदा, खिरोदा व रावेर मंडळातील केळीबागा या अतिउष्ण तापमानाच्या भट्टीत कमालीच्या होरपळून उद्ध्वस्त होत आहेत. तथापि, खानापूर येथील महसूल मंडळातील सततच्या पाच दिवसांपैकी एका दिवशी ४५ सेल्सिअंश तापमानात ०.०४ शतांश कमी अर्थात ४३.९६ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाल्याने खानापूर महसूल मंडळातील केळी उत्पादकांना एप्रिल महिन्यातील ३३ हजार रू प्रतिहेक्टरी विम्यावरच समाधान मानावे लागणार आहे. महावेधच्या तांत्रिक त्रुटीमुळे हेक्टरी आठ हजार रू.चा संरक्षित विम्याच्या रकमेचा फटका बसणार आहे. किंबहुना उर्वरित ऐनपूर, खिर्डी, रावेर, निंभोरा, सावदा व खिरोदा महसूल मंडळातील सतत पाच दिवस, सतत नऊ दिवस तर कुठे सतत १२ दिवसांच्या ४५ ते ४८ सेल्सिअंशवर तापमानाची नोंद झाल्याने संबंधित केळी उत्पादकांना हेक्टरी ४१ हजार रू संरक्षित विम्याची रक्कम मंजूर झाली आहे.
रावेर तालुक्यातील सर्व सातही महसूल मंडळातील केळी उत्पादकांना माहे एप्रिल महिन्यात किमान ४२ सेल्सिअंश तापमानापेक्षा सतत पाच दिवस अतिउष्ण तापमानाची नोंद झाल्याने ३३ हजार रू प्रतिहेक्टरी संरक्षित विम्याची रक्कम मंजूर झाली होती. तथापि, मे हिटच्या तडाख्यात सूूर्याने जणूकाही आग ओकल्याने किमान ४५.०१ ते ४८.०२ सेल्सिअंश तापमानाची पाच ते १२ दिवसांच्या अतिउष्ण लहरींची नोंद महावेधच्या ऐनपूर, खिर्डी, रावेर, निंभोरा, सावदा व खिरोदा महसूल मंडळातील हवामानमापक यंत्रावर झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या सहा महसूल मंडळातील केळी उत्पादकांना एप्रिल व मे महिन्यातील अतिउष्ण तापमानाचा ४१ हजार रू च्या संरक्षित विम्याच्या रकमेचा लाभ होणार आहे. या संरक्षित विम्याच्या रकमेने प्रत्यक्षात असह्य व प्रतिकूल तापमानात केळी बागांची झालेली करोडो रुपयांची अपरिमित हानी भरून निघणारी नसली तरी, या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मातीमोल भावात विकलेल्या केळीमालाच्या रकमेत काहीअंशी भर टाकण्यासाठी साह्यकारी ठरणार आहे.
सातही महसूल मंडळातील महावेधच्या हवामानमापक यंत्रावर झालेली नोंद अशी
खानापूर महसूल मंडळातील महावेधच्या हवामानमापक यंत्रावर दि. २३ ते २७ मे दरम्यान चार दिवस ४५ सेल्सिअंशपेक्षा जास्त ४६. १६ सेल्सिअंश पर्यंत नोंद झाली आहे. मात्र २३ मे रोजी ४४.९६ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली. यामुळे ०.०४ शतांश तापमानाच्या यांत्रिक तथा तांत्रिक त्रुटीमुळे खानापूर महसूल मंडळातील केळी उत्पादकांना एप्रिल व मे महिन्यातील अतिउष्ण तापमानाचा ४१ हजार रू च्या संरक्षित विम्याच्या रकमेऐवजी आठ हजार रू प्रतिहेक्टरी कमी रकमेचा फटका बसणार आहे. परिणामत: एप्रिल महिन्यातील ४२ सेल्सिअंश पेक्षा जास्त तापमानाची संरक्षित विम्याच्या ३३ हजार रू.रकमेवर त्यांना समाधान मानावे लागणार आहे.
दरम्यान, ऐनपूर महसूल मंडळात २३ ते २७ मे दरम्यान ४५.०१ ते ४६. १७ सेल्सिअंश सतत पाच दिवस अतिउष्ण तापमानाच्या नोंद झाली आहे.
खिर्डी बुद्रूक महसूल मंडळात १९ ते २७ मे दरम्यान सतत ९ दिवस किमान ४५.०४ ते कमाल ४६.४८ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.
खिरोदा महसूल मंडळात २३ ते २७ मे दरम्यान सतत पाच दिवस किमान ४५.२३ ते कमाल ४७.०३ तापमानातील उष्ण लहरींची नोंद झाली आहे
निंभोरा महसूल मंडळात २३ ते २७ मे दरम्यान सतत पाच दिवस किमान ४५.३ ते कमाल ४६. ९ सेल्सिअंश तापमानाची नोंद झाली आहे.
रावेर महसूल मंडळात १९ ते २७ मे दरम्यान सतत ९ दिवस किमान ४५.०९ ते ४५. ८७ सेल्सिअंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
सावदा महसूल मंडळात १७ ते २८ मे दरम्यान सतत १२ दिवस किमान ४५.९ ते कमाल ४८.०१ अतिउष्ण कमालीच्या तापमानाची नोंद झाली आहे.