रावेरला बौद्धधम्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात ६४ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 09:05 PM2019-05-12T21:05:32+5:302019-05-12T21:09:27+5:30
रावेर येथील फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेद्वारा रविवारी दुपारी आयोजित नवव्या सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध समाजातील ६४ नववधू-वर जोडपी विवाहबंधनात अडकली.
रावेर, जि.जळगाव : येथील फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेद्वारा रविवारी दुपारी आयोजित नवव्या सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध समाजातील ६४ नववधू-वर जोडपी विवाहबंधनात अडकली. पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांच्या आािण मान्यवरांच्या तथा बहुसंख्य समाजबांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शहरातील सरदार जी.जी.हायस्कूलच्या प्रांगणात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूज्य भन्ते अशोक कीर्ती यांनी नवदाम्पत्यांना त्रिशरण व पंचशील प्रदान केले. भारतीय बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष के.वाय.सुरवाडे, केंद्रीय शिक्षक सुमंगल अहिरे व शैलेंद्र जाधव यांनी बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, जयमंगलाष्कगाथेच्या धार्मिक मंगलविधीत नवदाम्पत्यांना विवाहबद्ध केले.
राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून सामूहिक विवाह सोहळ्यात प्रत्येक वधुवराला संसारोपयोगी वस्तू व अनुदान दिले जाते म्हणून समाजातील गरीब व गरजू व्यक्तींनी आपल्या मुला-मुलींचे विवाह सामूहिक विवाह सोहळ्यातच करण्याचे आवाहन संयोजकांनी मनोगतात केले.
खासदार रक्षा खडसे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. दीपपूजन जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे, भुसावळचे अॅड.राजेश झाल्टे, मुकुंद सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. धूपूजन दीपक नगरे, नगरसेवक जगदीश घेटे, नगरसेविका रंजना गजरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
समाजकल्याण विभागातर्फे अमोल तायडे व अनिल बोदडे उपस्थित होते.
खासदार रक्षा खडसे, व भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी मनोगत व्यक्त करून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. साहित्यिक जयसिंग वाघ, नगराध्यक्ष दारा मोहंमद, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, शीतल पाटील, माजी उपनगराध्यक्षा रंजना गजरे, दिलीप कांबळे, जिल्हा परिषदेच्या सदस्या पुष्पा तायडे, समता सैनिक दलाचे जिल्हाप्रमुख संतोष नरवाडे, राजू सवर्णे, उमेश गाढे, उत्तम प्रधान, अॅड.योगेश गजरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी केले. सूत्रसंचालन नगीनदास इंगळे यांनी, तर आभार अॅड.योगेश गजरे यांनी मानले.