रावेरला धनगर समाज संघटक समितीतर्फे ढोल बजाओ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 03:52 PM2020-09-25T15:52:05+5:302020-09-25T15:53:21+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध घोषणांच्या गजरात राज्य सरकारला जागी करण्याच्या उद्देशाने ढोल पिटवत धनगर समाज संघटक समितीतर्फे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
रावेर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध घोषणांच्या गजरात राज्य सरकारला जागी करण्याच्या उद्देशाने ढोल पिटवत शुक्रवारी धनगर समाज संघटक समितीतर्फे तहसील कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
उत्तर महाराष्ट्र धनगर समाजप्रमुख सुरेश धनके, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, उपाध्यक्ष लखन सावळे, धनगर समाज तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, रावेर पीपल्स बँकेचे चेअरमन अॅड.प्रवीण पासपोहे, अॅड.भास्कर निळे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज संघटक समितीतर्फे हे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत तायडे यांना निवेदन देण्यात आले. त्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याबाबत गंभीर नसलेल्या व झोपी गेलेल्या राज्य सरकारला जागी करण्यासाठी तथा गत महायुतीच्या सरकारने अनुसूचित जमातीसाठी घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यात धनगर समाजातर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे. होणाऱ्या दुष्परिणामास राज्य सरकार जबाबदार राहील, असे स्पष्ट केले आहे.
यावेळी तालुकाभरातून आलेले २५ ते ३० धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.