‘रेमण्ड’च्या आंदोलनाला ‘जमावबंदी’चे कुंपण!; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 07:25 PM2023-02-28T19:25:45+5:302023-02-28T19:26:06+5:30
वेतन कराराच्या वादातून सुरु असलेल्या ‘काम बंद’ आंदोलनामुळे पाचव्यादिवशीही ‘रेमण्ड’मधील कामकाज ठप्प होते.
कुंदन पाटील
जळगाव : वेतन कराराच्या वादातून सुरु असलेल्या ‘काम बंद’ आंदोलनामुळे पाचव्यादिवशीही ‘रेमण्ड’मधील कामकाज ठप्प होते. दरम्यान, ‘रेमण्ड’च्या प्रशासनाने ‘धमकी’ सत्र राबवायला सुरुवात केली असून दबावापोटी ११४ कामगारांनी कंपनीच्या करारावर सह्या केल्या आहेत, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून होत आहे. तशातच जळगाव प्रांताधिकाऱ्यांनी ‘रेमण्ड’ कंपनी परिसरात मंगळवारी दुपारपासून ‘जमावबंदी’चे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे कामगारांची कोंडी करण्यासाठी पडद्यामागची यंत्रणा ‘कलेक्टोरेट’ अस्त्र आमच्यावर डागत असल्याचा संताप कामगारांनी बोलून दाखविला.
दरम्यान, यासंदर्भात कंपनी प्रशासन प्रतिक्रिया द्यायला तयार नसताना खान्देश कामगार उत्कर्ष संघटना आणि कामगार उत्कर्ष सभेत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे.
नव्या सुधारित वेतन करारासाठी कामगारांनी कंपनी प्रशासनाविरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे रेमण्ड कंपनीतील निर्मिती पूर्णपणे ठप्प आहे.तशातच खान्देश कामगार उत्कर्ष संघटना आणि कामगार उत्कर्ष सभेत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
अचानक जमावबंदी
दरम्यान, जळगाव प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी मंगळवारी रेमंड कंपनीच्या आवारात दि.२८ रोजी दुपारी ४ वाजेपासून दि,७ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१), (२), (३) नुसार जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे ‘रेमण्ड’च्या कामगारांच्या आंदोलनाला आता कायद्याच्या कुंपणाने जखडले आहे.