सर्वोदयच्या 'त्या' सभासदांची १० रोजी पुन्हा चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 05:35 PM2021-03-03T17:35:05+5:302021-03-03T17:36:13+5:30
सर्वोदय शिक्षण संस्थेच्या ‘त्या’ ६७० सभासदांची पुन्हा १० रोजी चौकशी करण्यात येणार असून बुधवारी झालेल्या चौकशीत फक्त दोनच सभासद उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या ‘त्या’ ६७० सभासदांची पुन्हा १० रोजी चौकशी करण्यात येणार असून बुधवारी झालेल्या चौकशीत फक्त दोनच सभासद उपस्थित होते. बहुतांशी सभासदांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या नोटीसा मिळाल्या नसल्याने १० रोजी पुन्हा चौकशी ठेवण्याचा निर्णय सहाय्यक निबंधक पी. बी. बागुल यांनी दिला.
संस्थेच्या निवडणुकीसाठी सभासदांची यादी प्रसिद्ध झाली. त्यात विद्यमान संचालक मंडळाने संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील नवीन ६७० सभासद बेकायदेशीर घेतल्याचे निदर्शनास येताच संस्थेचे सभासद अॕड. राहुल पाटील यांनी याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करुन यानवीन सभासद यादीला आव्हान दिले होते. याबाबत गेल्या आठवड्यात खंडपीठाने दहा दिवसांच्या आत त्या सभासदांची चौकशी करण्याचे आदेश साहय्यक निबंधक यांना दिले होते.
न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी सकाळी साडेदहा वाजता सभासद चौकशीला सुरुवात झाली. यावेळी ६७० पैकी मधुकर निंबा चव्हाण व स्मिता मधुकर चव्हाण हे दोनच सभासद उपस्थित राहिले. बहुतांशी सभासदांना चौकशीला उपस्थित राहण्याच्या नोटीसा मिळाल्या नाहीत. त्यामुळे १० रोजी पुन्हा चौकशी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेतर्फे अॕड. रणजित पाटील तर अर्जदारांतर्फे अॕड. राहुल पाटील उपस्थित होते.