२५ टक्के किंमत कमी करून १३ वाळू गटांसाठी फेरनिविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:52+5:302021-03-14T04:15:52+5:30
जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांचे लिलाव झाल्यानंतर १३ वाळू गटांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची हातची किंमत ...
जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांचे लिलाव झाल्यानंतर १३ वाळू गटांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची हातची किंमत २५ टक्क्यांनी कमी करून फेरनिविदा काढण्यात येत आहे. २५ मार्च रोजी आलेल्या निविदा उघडण्यात येणार आहे.
पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील २१ वाळू गटांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २० जानेवारी रोजी निविदा उघडण्यात आल्यानंतर केवळ आठ वाळू गटांचा लिलाव झाला.
मात्र, जळगाव तालुक्यातील भोकर आणि पळसोद, एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, रावेर तालुक्यातील वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बु., केऱ्हाळे बु., धूरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी, अमळनेर तालुक्यातील धावडे, सावखेडा या गटांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या वाळू गटांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे फेरनिविदा प्रक्रिया राबविली गेली. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर २५ टक्के हातची किंमत कमी करून फेरनिविदा काढण्यात आली आहे. २५ मार्च रोजी आलेल्या निविदा उघडल्या जाणार असून, आता २५ टक्के हातची किंमत कमी करूनही किती गटांना प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष आहे.