खान्देशाच्या प्रश्नांना वाचा फोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:47 PM2018-10-04T12:47:01+5:302018-10-04T12:48:53+5:30
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरचे संचालक पुरुषोत्तम टावरी यांची माहिती
जळगाव : पुरेशा साधनसामग्री, विविध सुविधा यांचा अभाव असल्याने व मनपा तसेच औद्योगिक विकास महामंडळ यांच्यातील टोलवा टोलव यामुळे जळगावसह खान्देशातील औद्योगिक विकास रखडला आहे. आतापर्यंत एलबीटी असो की जकात यासाठी ज्या प्रमाणे लढा देऊन ते प्रश्न मार्गी लावले त्याप्रमाणेच आताही खान्देशातील व्यापार, उद्योग क्षेत्रातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चर लढा देणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरचे संचालक पुरुषोत्तम टावरी यांनी ‘लोकमत’ भेटीत दिली.
या संघटनेच्या संचालकपदी पुरुषोत्तम टावरी यांची चौथ्यांदा निवड झाली असून या निवडीनंतर पहिल्यांदाच टावरी यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी टावरी यांनी संघटनेच्या कार्याविषयी तसेच खान्देशातील व्यापार, उद्योगातील विविध प्रश्नांवर सविस्तर माहिती दिली.
जकातीसाठी जळगावातून लढा
व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणाºया जकात विरोधी आंदोलनास जळगावातून सुरुवात करीत २००५मध्ये सर्वप्रथम आंदोलन छेडले. त्यामुळे अहमदनगरलाही मोठा बंद झाला. यासह एलबीटीलाही विरोध करीत जकात व एलबीटी हद्दपार करण्यास महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरला यश आले.
खान्देशात सहा जणांना संधी
जकात व एलबीटीच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरने खान्देशातही नेतृत्वाची संधी दिली. त्यानुसार आज खान्देशातील सहा संचालक महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड अॅग्रीकल्चरवर कार्यरत आहे. यामध्ये टावरी यांच्यासह छबीदास राणे (जळगाव), विजय अग्रवाल (चाळीसगाव), नितीन बंग, अरुण नावरकर (धुळे), एन.डी. पाटील (शिरपूर) यांचा समावेश आहे.
एमआयडीसीला टाऊनशीपचा दर्जा द्या
खान्देशातील विचार केला तर महामार्गाशिवाय रेल्वे, विमानसेवा, औद्योगिक वसाहतीमध्ये पुरेसा सोयी नसणे अशा अडचणी असल्याने उद्योजक इकडे येत नसल्याचे टावरी म्हणाले. जळगावात रेल्वेची सुविधा आहे तर धुळ््यात नाही, जळगावात विमानसेवा सुरू झाली मात्र त्यात सातत्य नाही, औद्योगिक वसाहतीमध्ये मनपा सुविधा देत नाही व औद्योगिक विकास महामंडळही काही प्रयत्न करीत नाही, त्यामुळे येथील उद्योग क्षेत्र अधोगतीस जात आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीस टाऊनशीपचा दर्जा दिल्यास येथे मोठे उद्योग येण्यास मदत होईल, असा विश्वास टावरी यांनी व्यक्त केला.
किरकोळ व्यापारात गुंतवणुकीस विरोध
आधीच विविध अडचणींमुळे व्यापारी वर्ग अडचणीत आहे. त्यात आता किरकोळ व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीस परवानगी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे किरकोळ व्यापार संपुष्टात येणार असल्याने या विदेशी गुंतवणुकीस महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड अग्रीकल्चरचा विरोध आहे.
जीएसटीमध्ये कराचे दोनच दर असावे
वस्तू व सेवा करात वेगवेगळे दर अडचणीचे ठरत असून केवळ पाच टक्के व १८ टक्के असे दोनच दर असावे, अशी मागणी टावरी यांनी केली असून त्यासाठीही महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड अग्रीकल्चरचे प्रयत्न सुरू आहे.
राजकीय साथ मिळाल्यास विकास शक्य
खान्देशात व्यापारी, उद्योजक यांच्या प्रश्नांबाबत राजकीय मंडळींकडून साथ मिळत नसल्याची खंत टावरी यांनी व्यक्त केली. येथे विमानसेवा सुरळीत होण्यासह रखडलेले चौपदरीकरण व औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकीय मंडळींनी साथ दिल्यास येथे औद्योगिक विकास शक्य असल्याचा विश्वासही टावरी यांनी व्यक्त केला.