शिवसेनेचा माऊली संवाद : आदेश बांदेकर यांच्यासमोर महिलांनी वाचला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:31 PM2019-08-22T12:31:14+5:302019-08-22T12:31:39+5:30
भाऊजी नव्हे बंधू बनून आलेल्या आदेश बांदेकर यांच्याकडे महिलांनी केल्या विविध तक्रारी
जळगाव : महिलांची सुरक्षा, रोजगार, आरोग्य, शिक्षण असे अनेक प्रश्न असून ते आता तुम्हीच सोडवा, अशी मागणी करीत जळगावातील महिलांनी समस्यांचा पाढाच दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहचलेले मराठी अभिनेते तथा शिवसेनेचे सचिव आणि मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याकडे केली. शिवसेनेच्या ‘माऊली संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊजी नव्हे तर बंधू बनून आलेल्या बांदेकर यांच्याकडूनच आता अपेक्षा असल्याचे महिलांनी बोलून दाखविले.
शिवसेनेच्यावतीने आयोजित ‘माऊली संवाद’ कार्यक्रमासाठी बांदेकर हे जळगावात आले होते. सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलावर्गाने या कार्यक्रमात त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करत महिलांची सुरक्षा, रोजगार, आरोग्य, शिक्षण अशा विषयांवर आपल्या अडीअडचणी मांडल्या. शिवसेनेच्यावतीने याप्रश्नी शक्य ते प्रयत्न करण्याचे आश्वासन बांदेकर यांनी यावेळी दिले. या वेळी त्यांच्यासोबत मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ, शीतल म्हात्रे, संजना गाडी, आशा मामेडी यादेखल उपस्थित होत्या.
बचतगटासाठी बाजारपेठ हवी
यात बांदेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्यावतीने राज्यभरातील महिलांचे प्रश्न, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ‘माऊली संवाद यात्रे’चे आयोजन केले आहे. तुम्ही आपल्या समस्या निर्भीडपणे मांडा, असे आवाहन बांदेकर यांनी केले. यावेळी बहुसंख्य महिलांनी रोजगाराचा मुद्दा मांडला. आम्ही बचतगट चालवतो. मात्र, हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने आम्हाला अडचणी येतात. त्यामुळे बाजारपेठ मिळाली तर आम्ही स्वावलंबी होऊ शकतो. आम्हाला स्वत:च्या पायावर उभे राहता यावे म्हणून बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महिलांनी केली.
महिला सुरक्षेकडे वेधले लक्ष
राज्यभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जळगाव शहरातदेखील महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणीदेखील यावेळी महिलांनी बांदेकर यांच्याकडे केली. त्यावर बांदेकर यांनी याप्रश्नी लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. शहरातील मूलभूत सुविधा, महिलांचे आरोग्य तसेच शिक्षण या विषयांवरही काही महिलांनी अडचणी मांडत त्यावर मार्ग काढण्याची विनंती केली.
खेळामध्ये रमल्या महिला
कार्यक्रमात प्रश्नोत्तरे आटोपल्यानंतर आदेश बांदेकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित काही महिलांना मंचावर बोलावून खेळ घेतले. त्यात महिला चांगल्याच रमल्या होत्या.कार्यक्रमाचा मनमुराद आनंद महिलांनी लुटला.कार्यक्रमाच्या शेवटी सैराट चित्रपटातील‘झिंग झिंग झिंगाट...’या गीतावर उपस्थित महिलांनी नृत्य केले.यावेळी बांदेकर यांनीही ठेका धरला.