तिसरी लाट रोखण्यासाठी तयार, जिल्ह्यात १५०० बेड वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:16 AM2021-05-14T04:16:00+5:302021-05-14T04:16:00+5:30
- डमी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली असतांना प्रशासनाने विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू केल्या ...
- डमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली असतांना प्रशासनाने विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. मोहाडी रुग्णालयाच्या विस्तारासह सावदा व किनगाव या ठिकाणी बेड वाढविण्याचे नियोजन सुरु झाले आहे. साधारण १५०० ऑक्सिजन पाईपलाईन अंतर्गत बेड वाढविण्यात येणार असल्याची महिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत बेडची संख्या वाढविण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयांतील सीटू कक्ष पूर्णत: कोविड करण्यात आल्याने बेडची संख्या वाढून ऑक्सिजन पाईपलाईनअंतर्गत ३६८ बेड आले आहेत. यासह मोहाडी रुग्णालयात सद्यस्थितीत १२० बेडची ओटू पाईपलाईन टाकण्यात आली आहे. दरम्यान, या काळात खासगी कोविड हॉस्पिटलची संख्याही पहिल्या लाटेच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढल्याने बेडची संख्या वाढली आहे.
या ठिकाणी बेड वाढविण्याचे नियोजन
मोहाडी रुग्णालय : ८००
किनगाव रुग्णालय : १५०
सावदा रुग्णालय १५०
ग्रामीण रुग्णालय : ४००
प्रशासकीय यंत्रणा तयार
ऑक्सिजन
ऑक्सिजनची मागणी सद्या काही प्रमाणात घटली आहे. मात्र, पुरवठा हा अत्यंत आणीबाणीच्या स्थितीतच होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय टँक असल्याने यात थोडा दिलासा आहे. दरम्यान, येत्या दीड महिन्यात पाच ऑक्सिजन प्लांट सुरू होणार आहे. यात साधारण ८०० जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. याची वर्कऑर्डर देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये १६०० बेडची व्यवस्था आहे. दुसर्या लाटेत प्रचंड रुग्णसंख्या वाढली मात्र, या कोविड केअर सेंटरवर ताण आला नव्हता. त्यात काही संस्थांनीही कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. पहिल्या लाटेपेक्षा या बेडची संख्याही अधिक आहे.
दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्वात मोठा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, हळू हळू ते वितरणाचे नियंत्रण व निकष कडक करण्यात आल्याने त्यांचा वापर कमी झाला आहे. सरसकट वापरावर प्रशासनाने बंदी आणली आहे. शिवाय रेमडेसिविरला पर्याय म्हणून टॉसिलीझुमॅब, विरॅफीन ही औषधे वापरण्यावर भर द्यावा, अशा सूचानाही जिल्हा शल्यचिकित्सक व अधिष्ठाता यांनी संबधित यंत्रणेला द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी नुकतत्याच दिल्या. अन्य औषधांचा साठा जिल्हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.
ऑक्सिजन बेड
जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेडची संख्या वाढली आहे. ती १५०० ने अजून वाढविण्यात येणार आहे. यासाठी विविध ठिकाणी पाईपलाईनचे काम होती घेण्यात आले आहेत. यात मोहाडी रुग्णालयाचा यासाठी विस्तार केला जाणार आहे.
आगामी काळात आपण मोहाडी रुगणालयात ८०० तसेच किनगाव, सावदा या ठिकाणी प्रत्येकी १५० बेड होतील अशी व्यवस्था करणार आहोत. तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज असून त्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक