रेडिमेड तिळीचे लाडू, रेवड्या सर्वाधिक पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:40 AM2021-01-13T04:40:45+5:302021-01-13T04:40:45+5:30
जळगाव : मकर सक्रांतीसाठी बाजारपेठेत ठिकठिकाणी तिळाचे लाडू, चिक्की, गुळाच्या रेवड्या व हलवा विक्रीला आहे. मंगळवारी सायंकाळी ...
जळगाव : मकर सक्रांतीसाठी बाजारपेठेत ठिकठिकाणी तिळाचे लाडू, चिक्की, गुळाच्या रेवड्या व हलवा विक्रीला आहे. मंगळवारी सायंकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या मध्ये नागरिकांनी तिळ खरेदी करुन घरी लाडू बनविण्यापेक्षा रेडीमेड लाडू अन् रेवड्या खरेदीला पसंती देतांना दिसून आले. दरम्यान, बाजारात तिळीची आवक मोठ्या प्रमाणावर असली तरी, तिळीच्या रेडिमेड लाडूमागे ४० रुपयांची वाढ झाली आहे.
बाजारपेठेतील टॉवर चौक, फुले मार्केट, चौबे मार्केट व सुभाष चौक परिसरात ठिकठिकाणी तिळीचे लाडू, रेवड्या व हलवा विक्रेत्यांची दुकाने थाटली आहेत. तसेच परिसरातील किराणा दुकानदारांकडेही तिळीचे लाडू, रेवड्या विक्रीला उपलब्ध आहेत. यंदा मात्र तिळीची आवक जास्त असल्यामुळे बाजारपेठेत होलसेल भावात १२० ते १३० रुपयांपर्यंत तिळीची विक्री सुरू आहे. परंतु, लाडू तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य आणि त्यामागे मोठे परिश्रम लागत असल्यामुळे यंदा तिळीच्या लाडूत किलोमागे ४० रुपयांची वाढ होऊन, १८० ते २०० रुपयांपर्यंत विक्री होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
तसेच गुळ व साखर पासून तयार करण्यात आलेल्या रेवड्यांच्या दरात फारशी वाढ झाली नसून, गुळाच्या रेवड्या १२० रुपये व साखरेच्या रेवड्याही त्याच दरात विक्री केल्या जात आहेत. तर हलवा ८० ते १०० रुपये किलोने विक्री होत असल्याचे गणेश भोई या व्यावसायिकाने सांगितले.
इन्फो
२० रुपयांपासून ते अर्धा किलोपर्यंतच्या पॅकींगमध्ये लाडू व चिक्की उपलब्ध
महाग असल्यामुळे बहुतांश ग्राहक तिळीचे लाडू, चिक्की, रेवड्या जास्त खरेदी करत नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांनी ग्राहकांना परवडेल असे २० रूपयांपासून ते अर्धा किलोपर्यंत पॅकींगमध्ये लाडू उपलब्ध करुन विक्रीला ठेवले आहेत. या मध्ये नागरिक २० रुपयांच्या लाडू पाकीट खरेदीला जास्त प्राधान्य देत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.