एसटी कर्मचाऱ्यांचा रेडिमेड गणवेश...असून अडचण नसून खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:18 AM2021-09-26T04:18:48+5:302021-09-26T04:18:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एसटी महामंडळाने तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी कापड व शिलाई भत्ता देण्याची प्रक्रिया बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एसटी महामंडळाने तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी कापड व शिलाई भत्ता देण्याची प्रक्रिया बंद केले आहे. त्याऐवजी रेडिमेड गणवेश उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, हे रेडिमेड गणवेश अनेक कर्मचाऱ्यांच्या मापाचे नसल्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे चालक-वाहकांसह इतर कर्मचारी स्वखर्चाने गणवेश शिवून घेत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी कापड व शिलाईसाठी शिलाई भत्ता देण्यात येत होता. मात्र, तीन वर्षांपासून महामंडळाने कापड आणि शिलाई भत्ता ऐवजी एका खासगी कंपनीमार्फत प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षाला दोन रेडिमेड गणवेश देण्यात येत आहे. मात्र, महामंडळातर्फे देण्यात येणारे हे गणवेश कर्मचाऱ्यांच्या मापाचे नसल्याने तक्रारी करण्यात येत आहेत. यात कुणाच्या शर्टचे तर कुणाच्या पॅन्टचे माप चुकले आहे. रेडिमेड गणवेश हा व्यवस्थित होत नसल्यामुळे, अनेक कर्मचाऱ्यांनी तो नाकारला आहे.
इन्फो :
कर्मचारी म्हणतात, विरोध करून उपयोग झाला नाही
महामंडळाकडून देण्यात आलेल्या रेडिमेड गणवेश बाबत जळगाव आगारातील काही चालक व वाहकांनी आपल्या नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, महामंडळाने दरवर्षी देण्यात येणारा कापड व शिलाई भत्ता बंद केल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी कामगार संघटनांच्या माध्यमातून या निर्णयाला विरोध केला. मात्र, त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी महामंडळाचा हा निर्णय असल्याचे सांगत, आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
इन्फो :
वेळेवर पगार मिळत नाही, भत्ता काय मिळणार
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे पगार रखडत आहेत. एकीकडे पगार वेळेवर मिळत नसतांना, महामंडळ गणवेश भत्ता काय देणार, असा प्रश्नही या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. तर काही कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केल्याचा ३०० रूपये भत्ता मिळाला नसल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
ईन्फो :
जिल्ह्यातील आगार : ११
चालक : १ हजार ६२६
वाहक : १ हजार ६२६
कार्यशाळेतील कर्मचारी : ८००
इन्फो :
एसटी महामंडळातर्फे कर्मचाऱ्यांना शिलाई भत्ता देणे बंद केले आहे. रेडिमेड गणवेश उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व आगारांमध्ये हे गणवेश उपलब्ध असून, कर्मचाऱ्यांनी मागणी केल्यावर तत्काळ देण्यात येतील.
विशाल राखुंडे, विभागीय भांडार अधिकारी